औरंगाबाद : राज्यातील प्रदूषण कमी करण्यासह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि दिल्ली आयआयटी माजी विद्यार्थी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच आॅनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. यात २०२४ पर्यंत राज्यातील प्रमुख शहरांतील प्रदूषण ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले.कार्यशाळेत १२ वेबिनार होणार असून, याची सुरुवात २० आगस्ट रोजी झाली. यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ई. रवींद्रन, डॉ. व्ही. एम. मोटघरे, डॉ. दीपांकर सहा, दिल्ली आयआयटीचे अध्यक्ष रवींद्र कुमार, प्रो. प्रसाद मोडक, प्रकल्प समन्वयक डॉ. गीतांजली कौशिक यांच्यासह राज्यातील स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्यालये, निरी, दिल्ली आयआयटीचे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असे १५० जण सहभागी झाले होते.
ई. रवींद्रन म्हणाले की, राज्यात २६ महापालिका असून, यामध्ये २३ हजार टन कचरा जमा होता. यात ९ हजार एमएलडी सांडपाणी निर्माण होेते. या शहरांतील प्रदूषण कमी करण्यासाठी दीर्घकालीन लढा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डॉ. गीतांजली कौशिक म्हणाल्या की, जून महिन्यात पुणे, नाशिक आणि ठाणे महापालिका प्रशासनाशी संवाद साधला. प्रकल्प समजावून घेण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज त्यांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेत डॉ. मोटघरे, तज्ज्ञ डॉ. दीपांकर सहा, प्रसाद मोडक यांनीही मार्गदर्शन केले.रवींद्र कुमार म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या आॅनलाईन कार्यशाळेत दिल्ली आयआयटी माजी विद्यार्थी संस्था प्रथमच सोबत काम करीत आहे. नॅशनल क्लीन एअर अभियानांर्तगत राज्यात मोठ्या प्रमाणावर काम सुरू झालेले आहे. अनेक शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासह उपाययोजना आखल्या जात आहेत. मार्च २०२१ मध्ये प्रदूषण कमी करण्यासह जनजागृती करणाऱ्या राज्यातील सर्वोत्तम तीन शहरांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे. शहरातील हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी जनजागृती करणाºया विद्यार्थ्यांना महायुवा पुरस्काराने सन्मानित केले जाईल.