पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंगचे मोठे संकट निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली आहे. विकसित देश याचा सारा भार विकसनशील देशांवर टाकू लागले आहेत. अशातच खळबळजनक खुलासा समोर येत आहे. पृथ्वीचे तापमान वाढू लागलेले असतानाच वृक्ष, समुद्र आणि जमिनीने कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणे थांबविल्याचे संशोधनात समोर आले आहे.
दररोज उत्सर्जित होणारा कार्बन शोषून घेणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जमीन तिच्या पृष्ठभागावरील कार्बन शोषून घेते तर झाडे वातावरणातील कार्बन शोषून घेतात. समुद्रातील जीव, शेवाळ देखील पाण्यातील कार्बन शोषून घेतात. परंतू, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पृथ्वीचे तापमान वाढू लागल्याने ही कार्बन शोषून घेण्याची प्रक्रिया खंडीत होऊ लागली आहे.
गेल्या वर्षी वृक्ष आणि जमिनीने वातावरणातील थोडासाही कार्बन शोषून घेतलेला नाही. पृथ्वीच्या हळूहळू तापमानवाढीमुळे कार्बन शोषून घेणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये खंड पडत आहे. जमिनीद्वारे शोषलेल्या कार्बनचे प्रमाण 2023 मध्ये खूपच कमी झाले आहे. महत्वाचे म्हणजे २०२३ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होते. याचा परिणाम म्हणजे जंगलांनी, वृक्षांनी आणि मातीने काहीच कार्बन शोषून घेतलेला नाहीय.
न्यूयॉर्क क्लायमेट वीकमध्ये पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्चचे संचालक जोहान रॉकस्ट्रॉम यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसंस्था त्यांची कार्बन शोषून घेण्याची क्षमता गमावत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. हा प्रकार पृथ्वीच्या पृष्ठभागावरच नाही तर समुद्राच्या पोटातही याचे परिणाम दिसू लागले आहेत.
ग्रीनलँडमधील हिमनदी आणि आर्क्टिक बर्फाचे तुकडे अपेक्षेपेक्षा वेगाने वितळत आहेत. यामुळे गल्फ स्ट्रीममधील समुद्राच्या प्रवाहाला बाधा पोहोचली असून तेथील कार्बन शोषणाचा वेग मंदावला आहे. बर्फ वितळल्याने सूर्याचा प्रकाश थेट आतील समुद्री जीवांवर पडत आहे. यामुळे शेवाळ खाणाऱ्या झूप्लँक्टनना बाधा पोहोचू लागली आहे.