लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : दिसायला सुंदर, टवटवित; कोणालाही सेल्फी काढण्याचा मोह व्हावा, अशा कॉसमॉसच्या फुलांमुळे खामगाव व परिसरात पिवळ्या रंगाचा गालिचा पसरल्यासारखा भासत आहे. रंगावरून मोहात पडू नका, कॉसमॉस हे एक विदेशी तण आहे. अमर्याद पसारा वाढवून ते स्थानिक प्रजातींना प्रतिबंध घालते. त्याने येथील जैवविविधता धोक्यात येण्याचा सावधानतेचा इशारा वनस्पती तज्ज्ञांनी दिला आहे.खामगाव येथून बुलडाणा कडे जाताना बोथा घाटात, दरीच्या बाजुला तसेच मेहकर आणि चिखली तालुक्यातील महामार्गावर दुतर्फा, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत आणि खामगाव तालुक्यातील जागृती आश्रमात सर्वत्र सध्या पिवळ्या रंगांच्या फुलांचा जणू गालिचा टाकल्याचा भास होतो. सुर्यफुलाच्या कुळातील ही कॉसमॉसवनस्पतीची फुलं चटकन लक्ष वेधून घेतात. बोथा घाटातील हिरवागार निसर्ग, पावसाळी हवा, डोंगररांगेच्या दुतर्फा धरणांची सिनरी, विकेंडची उत्साही मानसिकता आणि त्यात टवटवीत, डोलणारी पिवळीधम्मक फुलं पाहून पर्यटकांचा उत्साह द्विगुणित होतो. काही लोक या फुलझाडाच्या बिया, रोपं आपल्या घराकडे लावण्यासाठी सोबत नेतात. मात्र, वनस्पती तज्ज्ञांनी अशा उत्साही लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते, या उक्तीप्रमाणे ही कॉसमॉसची पुष्पवनस्पती एक विदेशी तण आहे. त्याचा प्रसार झपाट्याने होतो. स्थानिक वनस्पतींच्या वाढीला मारक आहे, असे मत जाणकारांनी नोंदवले आहे.
मूळ मेक्सिकोमधील वनस्पती
खामगावातील पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते रविंद्र गुरव यांनी या तनाच्या प्रसाराबाबत सांगितले, सुर्यफुलाच्या कुळातील या वनस्पतीला भरपूर फळे येतात. त्याच्या बिया वाºयाबरोबर वाहून नेल्या जातात. या वनस्पती वाढलेल्या दिसतात, मूळ वनस्पती मेक्सिकोमधील आहे. त्यामुळे परदेशातून झाडे आणताना काळजी घ्यावी.माळरानावर फुलतात झाडे ही वनस्पती कमी पाण्यात येते. खडकाळ, माळरान, डोंगर उतार अशा कोणत्याही जमिनीत उगवते. या वनस्पतीचे बीज दिर्घकाळ सुप्तावस्थेत राहू शकते. विजाची उगवण क्षमता जवळपास १०० टक्के इतकी आहे. अंगभुत गुणांमुळे या वनस्पतीला किडीचा प्रादुर्भाव होत नाही. या वनस्पती स्थानिक झाडोरा, गवत यांना उगवू. वाढू देत नाहीत. त्यामुळे तेथील जैवसाखळी धोक्यात येते.
गांजर गवताप्रमाणेच कॉसमास वनस्पती आपल्या सावलीत दुसरी वनस्पती वाढू देत नाही. उग्रवासामुळे जनावरेही या वनस्पतीला खात नाहीत. दोन्ही वनस्पती नष्ट करण्यासाठी तरोटा हा रामबाण उपाय आहे. - रविंद्र गुरव, ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक,खामगाव.