सातारा - पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष वाचवणं महत्त्वाचं आहे. हे लक्षात घेऊन खटाव तालुक्यातील जांब जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘चिपको आंदोलन’ करून वृक्ष वाचविण्याचा संदेश दिला.
जांब या गावात पर्यावरण संरक्षण व निसर्ग संवर्धन या विषयावर कार्यरत असलेला युवक रोहित बनसोडे याने जांबमधील शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरण संरक्षण, कुऱ्हाड बंदी व जंगलात वणवा रोखण्यासाठी जनजागृती केली. यावेळी गावफेरी काढून गावातील नागरिकांना वनसंपदा, वनसंवर्धन, पाणी अडवा, पाणी मुरवा याचे महत्त्व पटवून दिले. येणाऱ्या काळात भयंकर अशा दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. म्हणून आज आपण जागे झाले पाहिजे, झाडे लावली पाहिजेत, पाणी अडवले पाहिजे, मुरवले पाहिजे, आपले जंगल रक्षण करण्यासाठी पहिली ते दहावीचे विद्यार्थी, शिक्षक यांनी घोषणा देत पर्यावरण रॅली काढून गावातील पारावर एका झाडाला सर्व मुलांनी साखळी करून झाडाच्या भोवती फेऱ्या मारून चिपको आंदोलन सुरू केले.
या विषयावर मुक्त चर्चा, संवाद, लहान मुलांशी हितगूज साधण्यात आले. मुख्याध्यापक ब्रह्मदेव ननावरे, शिक्षक लिलाधर शिंदे, राजाराम मदणे, ब्रह्मदेव ननावरे, पोपटराव माळवे, वैशाली ननावरे, कुचेकर सर, शंकर बनसोडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी जूनमध्ये ५०० झाडे शाळेमार्फत लावण्याचा निर्धार करून पर्यावरण संरक्षण करण्यासाठी शपथ घेतली.
काय आहे ‘चिपको’ आंदोलन
कला शाखेतील बारावीच्या पुस्तकामध्ये चिपको आंदोलनावर धडा आहे. वृक्ष संवर्धनासाठी उत्तराखंडमध्ये हे आंदोलन १९७० च्या दशकात झाले होते. चमोली जिल्ह्याच्या जांब गावात सुमारे २ हजार ४०० वृक्ष तोडण्यात येणार होते. हे वृक्ष वाचविण्यासाठी गौरादेवी यांच्या नेतृत्वाखाली २७ महिलांनी जीवाची बाजी लावून हे आंदोलन यशस्वी केलं. वृक्षतोड करायला कोणी आलं की आंदोलक वृक्षाला बिलगून उभं राहायचे. त्यामुळे वृक्षतोड करणं अशक्य होत होते. त्यानंतर हे आंदोलन देशभर करण्यात आले.
कार्यक्रमासाठी या शाळेत जाणे झाले. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांना निसर्ग संवर्धनाबाबत माहिती दिली. त्याचवेळी चिपको आंदोलन करण्याची संकल्पना मांडली. ती शाळेला आवडली आणि आम्ही प्रबोधन फेरी काढून हे आंदोलन केले. संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम करण्याचे नियोजित आहे.
- रोहित बनसोडे, पर्यावरणस्नेही विद्यार्थी