मुंबई : वायू प्रदूषणाचा मुद्दा आता केवळ दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठया शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर वायू प्रदूषणाने दक्षिण भारताचीही हवा खराब केली आहे. मात्र येथील वायू प्रदूषणाला आळा घालता यावा म्हणून विद्यार्थी मित्रांनी थेट आपल्या खिशातल्या पैशालाच हात घातला आहे. विद्यार्थ्यांनी ‘पॉकिट मनी’ ची बचत करत याद्वारे खरेदी करण्यात आलेले फेस मास्क नागरिकांना वितरित केले आहेत. विद्यार्थी मित्र केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सर्वच स्तरात जनजागृतीही सुरु केली आहे.बंगळूरुच्या विद्यार्थींची ही गोष्ट असून, यांचा आदर्श घेत आता उर्वरित राज्यातील विशेषत: मुंबईसारख्या नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि प्रदूषित अशा चंद्रपूरमधील नागरिकांनी धडा घ्यावा, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे. गेल्या दिड वर्षांपासून हेन्नूर, नारायणपुरा आणि कोथनूरमधील रहिवासी प्रदूषणाला तोंड देत आहेत. तक्रारी करूनही अपेक्षित उपाय योजले जात नाहीत. स्वाक्षरी मोहिमा, ऑनलाइन याचिका, अहवाल इत्यादी अनेक घटकदेखील रस्त्याच्या दुरवस्थेसह वायू प्रदूषणापासून त्यांना वाचवू शकले नाहीत. यावर उपाय म्हणून थेट विद्यार्थी मित्रच रस्त्यांवर उतरले. त्यांनी नागरिकांमध्ये प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली. ‘मोफत मुखवटा वितरण अभियान’ हाती घेत जनजागृती मोहीम सुरु केली. हेच करताना परिसराचा अभ्यासही केला. श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या ओळखल्या. आणि मग मोफत फेस मास्क वाटण्याचे ठरविले, असे क्रिस्टु जयंती महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. डॉ. जुबी थॉमस यांनी सांगितले.दुकानदार, भाजी विक्रेते आणि अन्य उत्पादकांशी संवाद साधत प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे. एका मास्कने काही होणार नाही पण एक मास्कही खुप सारे बदल करण्यासाठी सकारात्मक दिशा आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.- गेल्या दोन वर्षांत श्वसन आजार असलेल्या रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे.- एका दिवसात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दहा पैकी आठ रुग्णांना दमा, खोकला, छातीत रक्तसंचय आणि इतर श्वसनविकारांचा त्रास होतो.- या शारीरिक परिस्थितींवर दरमहा १० हजारपेक्षा जास्त प्रकरणे नोंदविली जातात.- धूळ प्रदूषणामुळे आजारपणाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.- समुदाय-आधारित अभ्यासानुसार धूळ-संबंधित समस्यांमुळे २ हजारांहून अधिक लोक स्थानिक रुग्णालयात भेट देतात.- धूळ प्रदूषणामुळे बाधित झालेल्यांपैकी बहुतेक लोक १० वर्षांपेक्षा कमी व ५० वर्षांपेक्षा जास्त आहेत.
विद्यार्थ्यांच्या खिशातला पैसा थोपवतोय वायू प्रदूषण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 7:47 PM