निशांत वानखेडे
नागपूर : वातावरणात पृथ्वीचे कवच म्हणून काम करणाऱ्या ओझाेन थराला पडलेले भगदाड कमी हाेत असल्याचे संकेत शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. या भगदाडाने मानवासह पृथ्वीवरील सजीवसृष्टीवर सूर्याच्या अतिनील किरणांचा धाेका वाढविला हाेता. हे छिद्र २०५० ते २०७० पर्यंत पूर्ण भरून निघण्याचे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत.
ओझाेन थर हा पृथ्वीच्या आवरणासारखे काम करताे. हे आवरण सूर्याच्या अतिनील किरणांचा प्रकाेप जीवसृष्टीवर पडू देत नाही. प्रदूषण वाढल्याने या थराला माेठे भगदाड पडले हाेते. त्यामुळे अंटार्क्टिकामध्ये बर्फ वितळायला सुरुवात झाली हाेती. १९९० च्या दशकापासून या छिद्राचा आकार सातत्याने वाढत चालला हाेता. मात्र, २०२२ च्या इंडेक्सनुसार अंटार्क्टिकावरील ओझोन छिद्राचा आकार २६ टक्के कमी झाला आहे.
प्रदूषकांवर ५०% नियंत्रणप्रदूषणासोबत ओझोनला छिद्र पाडणारी प्रदूषके वाढली. त्यात क्लोरोफ्लुरोकार्बन, क्लोरीन, ब्रोमीन, हालोन्स, आदी वायूंचा समावेश आहे. ही प्रदूषके रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, फोम ब्लॉविंग, इलेक्ट्रिकल साहित्य, इंडस्ट्रियल सोलवंट, ड्राय क्लिनिंग, ऐरोसोल, आदी वस्तूंमध्ये वापरात येत असते. यावर बंदी आणली गेली. त्यामुळे ओझाेनचे छिद्र हळूहळू भरून निघत आहे.
ओझाेन थराला पडलेले छिद्र भरून निघणे ही आनंदाची गाेष्ट आहे. वेगवेगळ्या करारानुसार भारतासह जगभरातील देशांनी प्रदूषकांवर बंदी आणल्याचे हे शुभ परिणाम आहेत. यामुळे आर्क्टिक व अंटार्क्टिका ध्रुवावरील बर्फ वितळण्याची प्रक्रिया थांबेल.- प्रा. सुरेश चाेपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट साेसायटी