- श्रीकिशन काळे
पुणे : पश्चिम घाटामध्ये सर्वाधिक जैवविविधता असून, गेल्या ६० वर्षांमध्ये येथे नवीन ८५ प्राण्यांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यामध्ये बेडूक, पाल, खेकडे, मासे आदींचा समावेश आहे. या प्रजातींना नाव मिळाल्याची माहिती भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेचे पश्चिम प्रादेशिक केंद्राचे प्रमुख डॉ. पी. एस. भटनागर यांनी दिली.
भारतीय प्राणी सर्वेक्षणाचे पुण्यात १९६० पासून विभागीय केंद्र आहे. त्या ठिकाणी अनेक वैज्ञानिक काम करत असून, त्यांनी या ८५ नव्या प्रजाती शोधल्या आहेत. या केंद्रातर्फे सातत्याने प्राण्यांच्या प्रजाती शोधण्यावर संशोधन सुरू असते, त्यांची संपूर्ण माहिती घेणे, त्याबाबत यापूर्वी कुठे माहिती किंवा ती प्रजाती दिसली आहे का ? अशी संपूर्ण माहिती संकलित करून आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये ती प्रसिध्द केली जाते. त्यानंतरच नव्या प्रजातीला नाव मिळते आणि ते जाहीर होते, असे डॉ. भटनागर यांनी सांगितले. खरंतर पश्चिम घाटात अनेक प्रजाती आहेत. त्या पुर्वीपासूनच तिथे असतात. पण त्याला नाव नसते. ते समोर आणण्याचे काम संशोधक करीत असतात.
लॉकडाऊनमध्येही काम सुरूच
लॉकडाऊन असल्याने सर्व बंद होते. पण संशोधनाचे काम मात्र सुरूच होते. सरकारने घालून दिलेल्या नियमानूसार संशोधक आपले काम करीत आहेत.
देशातून ५ हजारहून अधिक नव्या प्रजाती
भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेने आतापर्यंत संपूर्ण देशातून ५ हजारहून अधिक नव्या प्रजाती समोर आणल्या आहेत. १६ प्रादेशिक केंद्रांद्वारे या प्रजातींवर संशोधन झाले आहे. देशात १९१६ पासून ही संस्था सुरू झाली.
५३३ प्राण्यांचे अवशेष जतन
पुण्यातील केंद्रात प्राण्यांचे संग्रहालय असून, त्यात पश्चिम घाटातील सुमारे ५३३ प्राण्यांचे अवशेष जतन करून ठेवले आहेत. ते नागरिकांना मोफत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. परंतु, सध्या लॉकडाऊनमुळे संग्रहालय बंद आहे. संग्रहालयात आफ्रिकन बिबट्या, हॉर्नबिल, विविध प्रकारचे कीटक, पक्षी, सस्तन प्राणी आणि रायगड येथे आढळलेले सेंटीपीडी ही प्रजाती येथे पहायला मिळते. जगात समुद्रात राहणारे सर्वात छोटे कास ‘आॅलिव्ह रिडले टर्टल’ येथे जतन करून ठेवले आहे.