अकोला : पर्यावरणातील घटकांचा दैनंदिन होत असलेला ºहास पाहता अकोला जिल्ह्याच्या पर्यावरणासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात विविध प्रकारची जैवविविधता रुजली आहे. जैवविविधतेची संपन्नता टिकवून ठेवण्यासाठी अभयारण्यातील मानवी हस्तक्षेप रोखण्यासोबतच पर्यावरणातील घटकांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज जैवविविधता दिनानिमित्त अधोरेखित होत आहे. अकोला जिल्ह्यातील जंगलाचे प्रमाण पाहता अत्यल्प आहे. त्यातील जैवविविधतेलाही मर्यादा आहेत. या दोन्ही बाबी पाहता काटेपूर्णा अभयारण्य जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या अभयारण्यातील जैवविविधता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. या अभयारण्याचे क्षेत्र कमी असले तरी तेथे विविध जातींचे प्राणी, वनस्पती आहेत. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मध्ये नमूद प्राण्यांच्या नोंदीपैकी सस्तन प्राण्यांच्या २५ प्रजाती आहेत. त्यातील तीन धोकाग्रस्त झाल्या आहेत. त्यामध्ये बिबट, अस्वल, इंडियन पँगोलिनचा समावेश आहे. पक्ष्यांच्या १२३ प्रजाती आहेत. या अभयारण्यात २७ प्रजातींच्या पक्ष्यांचे स्थलांतर होते. सोबतच महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियल या अभयारण्यात आढळतो. १९ प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत. त्यापैकी अजगर व सुसर धोकाग्रस्त आहेत. तर फुलपाखरांच्या ७४ प्रजाती आहेत. त्यातील दोन प्रजाती धोक्यात आहेत. या अभयारण्यात कोळ््याच्या ९२ प्रजाती आढळतात. तर वनस्पती प्रजातींमध्ये मोठी व मध्यम प्रकारची झाडे ५१ आहेत. झुडुपांच्या प्रजाती २३ आहेत. वेलींच्या ८ प्रजाती आहेत. बांबू व गवताच्या १८ प्रजाती आहेत. जिल्ह्याच्या एकूणच पर्यावरणात या अभयारण्यातील जैवविविधतेचा मोठा हातभार लागलेला आहे.
जिल्ह्याच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या अभयारण्याचेसंरक्षण आणि संवर्धन करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरण टिकेल तरच मानवी जीवन सुरक्षित आहे, हेही सर्वांनी ध्यानात घ्यायला हवे.- अमोल सावंत, संस्थापक, निसर्गकट्टा.