औरंगाबाद : बीडमधील पालवन येथे १३ व १४ फेबु्रवारी रोजी होणाऱ्या पहिल्या वृक्ष संमेलनाचे अध्यक्षपद हे वटवृक्षाकडे असणार आहे. दोनदिवसीय संमेलनाचा समारोप व्हॅलेंटाईन डे दिवशी होणार आहे. ट्री व्हॅलेंटाईन ही संकल्पना रुजावी, असा संदेश त्या दिवशी संमेलनातून देण्यात असल्याचे संमेलन आयोजक सह्याद्री देवराईचे सर्वेसर्वा अभिनेता सयाजी शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, साहित्यिक अरविंद जगताप, शिवराम बोडखे, महेश नागपूरकर, विजय शिंदे, संजय तांबे आदींची उपस्थिती होती. शिंदे म्हणाले, वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी जनजागृतीच्या उद्देशाने हा प्रयत्न केला जात आहे. रॉक गार्डन, मियावॉकी पार्क या संकल्पनेचा विचार करून वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. वृक्षदिंडी, बिया, पाने, झाडांचे प्रकार, वड, उंबर, जांभूळ वृक्षांची पालखीने संमलेनास सुरुवात होईल. वृक्ष, फुलपाखरे, पक्षी, वृक्ष आणि रोपवाटिका यातील करिअर, गवतांच्या जाती, जलव्यवस्थापन याबाबींवर विद्यार्थ्यांना संमेलनात २० हून अधिक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल. संमेलनासाठी विभागीय आयुक्तालय, वनविभागाचे सहकार्य असेल. अप्पर आयुक्त टाकसाळे यांनी मराठवाड्यातील जंगल ४ टक्के असल्याचे सांगून आगामी काळात परिस्थिती भीषण होईल, असे भाकीत केले. साहित्यिक जगताप यांनी संमलेनामागील भूमिका विशद केली.
दरवर्षी याचदिवशी संमेलनव्हॅलेंटाईन डे च्या दिवशी झाडाला टॅग बांधायचा आहे. झाडांसोबत तो दिवस साजरा करण्याची परंपरा झाली, तर मराठवाडा नंदनवन होईल. त्यामुळे यापुढे दरवर्षी या दोन दिवशी संमेलन होईल. २५ एकर परिसरात संमेलन असेल. ऊन-सावलीचे व्यासपीठ, प्रदर्शन स्टॉल, वृक्ष व्हॅन, झाडांची मिरवणूक, ग्रीन आर्मी आदींचे आयोजन येथे असेल.
माणसं झाडांच्या वाईटावरकार्बन शोषून प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या वाईटावर माणसे उठली आहेत. झाड आॅक्सिजन देताना कधीच भेदभाव करीत नाही. झाड लावण्याचे फॅड सध्या आले आहे; परंतु ते जगविण्याचा विचार कुणी करीत नाही. सह्याद्री देवराई वृक्षरोपणानंतर किती रोपांची वाढ झाली, ते मोठे झाले. याची पूर्ण माहिती ठेवण्यात येईल, असा दावा शिंदे यांनी यावेळी केला.