सोशल मीडियात अनेकदा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यावर युझर्स तात्काळ विश्वास देखील ठेवतात. यातून अनेकांची फसवणूक होते तर अनेकजण मेसेजची सत्यता पडताळून न पाहता मेसेज फॉरवर्ड करत असतात. पण यातून मोठी अडचण निर्माण होऊ शकते. सध्या सोशल मीडियात अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत केंद्र सरकार देशातील सर्व महिलांच्या खात्यात पंतप्रधान नारी शक्ती योजनेअंतर्गत २ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम जमा करणार असल्याचा दावा केला जात आहे. पण यात कोणतंही तथ्य नाही. संबंधित व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे.
महिलांच्या खात्यात २ लाख २० हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार असल्याचा असा कोणताही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर तो अजिबात फॉरवर्ड करू नका. याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही वैयक्तिक माहितीची मागणी केली गेल्यास ती देऊ नये, असं केंद्र सरकारच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.
यूट्यूबवर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नारी शक्ती योजनेअंतर्गत देशातील सर्व महिलांच्या खात्यात २ लाख रुपये जमा केले जाणार असून २० हजार रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे, असा दावा केला गेला आहे. सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. सरकार कोणत्याही हमीविना, बिनव्याज आणि विना सुरक्षा संपूर्ण देशातील महिलांसाठी ही योजना राबवत असल्याचंही यात दावा करण्यात आला आहे. पण या व्हिडिओबाबतचं फॅक्ट चेक PIB नं केलं आहे. पीआयबीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबतचं संपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आलं असून संबंधित व्हिडिओ खोटा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पीआयबीनं संबंधित फेक व्हिडिओची माहिती शेअर केली असून या व्हिडिओतील भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन केलं आहे. कारण केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना सुरू करण्यात आलेली नाही.