Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 07:32 PM2024-05-22T19:32:38+5:302024-05-22T19:47:46+5:30

Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या काळ्या रंगावर भाष्य करताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे.

clipped video narendra modi commenting president murmus complexion false claim | Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड

Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड

Claim Review : राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करताना पंतप्रधान मोदींनी त्यांची तुलना आफ्रिकन लोकांशी केली.
Claimed By : facebook User
Fact Check : दिशाभूल

Created By: Boom
Translated By: ऑनलाइन लोकमत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या काळ्या रंगावर भाष्य करताना दिसत आहेत.

16 सेकंदाच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये पंतप्रधान "ज्यांच्या त्वचेचा रंग काळा आहे ते आफ्रिकेतील आहेत. द्रौपदी मुर्मू देखील आफ्रिकन आहेत आणि त्यामुळे त्यांच्या त्वचेचा रंग काळा असेल तर त्यांना पराभूत केलं पाहिजे" असं म्हणताना दिसत आहेत. 

BOOM ने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये ही एक व्हिडीओ क्लीप असल्याच समोर आलं आहे. मूळ व्हिडिओमध्ये, पंतप्रधान मोदी हे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या दक्षिण भारतीय लोकांची आफ्रिकन लोकांशी तुलना करण्याच्या विधानाच्या संदर्भात बोलत होते. वास्तविक, पंतप्रधान मोदी काँग्रेसवर आरोप करत होते की, द्रौपदी मुर्मू यांच्या रंगामुळे काँग्रेसला त्यांना राष्ट्रपती बनवायचं नव्हतं.

फेसबुकवर हा एडिट केलेला व्हिडीओ शेअर करताना एका युजरने लिहिलं की, 'भारतातील ज्या लोकांचा रंग काळा आहे त्यांनी 4 जूनपूर्वी आपला रंग गोरा करावा. कारण नरेंद्र मोदींनी भारतातील सर्व काळ्या लोकांना आफ्रिकन म्हटलं आहे. नरेंद्र मोदींनी तर आपल्या देशाच्या राष्ट्रपतींबद्दल बोलले आहे. नरेंद्र मोदी चार जूनला आले तर तुम्हा सर्वांना आफ्रिकेत जावं लागेल.

पोस्टची आर्काइव लिंक.

फॅक्ट चेक 

व्हायरल व्हिडीओची कीफ्रेम रिवर्स इमेज सर्ज केल्यानंतर आम्हाला 8 मे 2024 चा NDTV चा रिपोर्ट सापडला. या रिपोर्टमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओशी संबंधित विधानाचा उल्लेख करण्यात आला होता. रिपोर्टनुसार, पंतप्रधान मोदींनी तेलंगणातील वारंगल येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना सॅम पित्रोदा यांच्या जातीयवादी विधानावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता.

8 मे 2024 रोजी वारंगलमधील या सार्वजनिक सभेचा संपूर्ण व्हिडीओ आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत YouTube वर आढळला. अंदाजे 58 मिनिटांच्या या लाईव्ह व्हिडीओमध्ये ही घटना 43 मिनिटे 50 सेकंद ते 45 मिनिटे 23 सेकंदाच्या दरम्यान पाहता येईल.

द्रौपदी मुर्मू यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या प्रयत्नांवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणतात, "आज मला कळलं की राजपुत्र (राहुल गांधी) यांचे अंकल (सॅम पित्रोदा) अमेरिकेत राहतात, हे अंकल राजकुमारांचे मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी आहेत. आजकाल क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर आहे... जर काही गोंधळ असेल तर ते थर्ड अंपायरला विचारतात, त्याचप्रमाणे जर राजकुमार गोंधळलेले असतील तर ते सल्ला घेतात."

मोदी पुढे म्हणतात, "या राजपुत्राच्या तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक अंकलनी एक मोठं रहस्य उघड केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की ज्यांच्या त्वचेचा रंग काळा आहे, ते सर्व आफ्रिकेतील आहेत. याचा अर्थ तुम्ही सर्व, माझ्या देशातील बरेच लोक काळ्या त्वचेचे आहेत. रंगाच्या आधारे त्यांनी मला खूप शिव्या दिल्या, तेव्हाच मला समजलं की त्वचेचा रंग पाहून त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना देखील आफ्रिकन असल्याचं मानलं आणि त्यामुळेच त्वचेचा रंग काळा असेल तर पराभूत करा."

यावरून हे स्पष्ट झालं आहे की, व्हायरल झालेल्या व्हिडीओतील पंतप्रधान मोदींचं अपूर्ण भाषण मूळ संदर्भापासून कट करून शेअर करण्यात आलं आहे.

रिपोर्टनुसार, काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी इंग्रजी वृत्तपत्र स्टेट्समनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, "आम्ही भारतासारख्या विविधतेने नटलेला देश एकसंध ठेवू शकतो, जेथे पूर्वेकडील लोक चिनी आहेत, पश्चिमेकडील लोक अरब आहेत. उत्तरेकडील लोक आफ्रिकनसारखे दिसतात. यामुळे काही फरक पडत नाही. येथे आम्ही सर्वजण भाऊ-बहीण आहोत."

सॅम पित्रोदा यांच्या या विधानानंतर ते वादात सापडले. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विधानावर टीका करत राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

(सदर फॅक्ट चेक Boom या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)
 

Web Title: clipped video narendra modi commenting president murmus complexion false claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.