Created By: Fact CrescendoTranslated By: ऑनलाइन लोकमत
लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आपला जोरदार प्रचार करत आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी एका पत्रावर स्वाक्षरी करत असल्याचं पाहायला मिळत असून ते काँग्रेसमधून राजीनामा देत असल्याचं सांगण्यात येत आहे.
आमच्या WhatsApp फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडीओ पाठवून याबद्दल फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणी केल्यावर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ बनावट असल्याचं समोर आलं आहे. राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करत होते.
काय आहे दावा?
"मी राहुल गांधी. आज काँग्रेसमधून राजीनामा देत आहे. माझ्याकडून आता निवडणुकीसाठी हिंदू असल्याचं ढोंग होऊ शकत नाही. मी न्याय यात्रा काढली परंतु, मोदीराजमध्ये माझ्यासारख्या सर्वांना जेलमध्ये पाठवलं जाईल म्हणनून मी माझ्या आजोबांच्या घरी इटलीला जात आहे" असं राहुल गांधी यांनी पत्र वाचताना सांगितलं आहे.
"आणि अशा प्रकारे मोदीजींना घाबरून राहुल गांधींनी राजीनामा दिला" असं युजर्सनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहीलं आहे.
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर व्हायरल व्हिडीओ बनावट असल्याचं समजलं.
द हिंदूने आपल्या ट्विटर अकाउंटवर हाच व्हिडीओ 3 एप्रिल रोजी शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडच्या जिल्हाधिकारी रेणू राज यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला" असं म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंवर नामांकन अर्ज दाखल करतानाचा व्हिडीओ अपलोड केला आहे. "मी राहुल गांधी, लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार म्हणून नामांकित दाखल करत आहे" असं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
व्हिडीओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओ एडिट करून बनावट विधान राहुल गांधीच्या नावाने शेअर केलं जात आहे.
निष्कर्ष
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी राजीनामा देत नसून तो बनावट आहे हे यावरून सिद्ध होतं. राहुल गांधी केरळच्या वायनाडमध्ये लोकसभा निवडणुकीचा नामांकन अर्ज दाखल करत होते. खोट्या दाव्यासह व्हिडीओ व्हायरल होत आहे.
(सदर फॅक्ट चेक Fact Crescendo या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)