Created By: बूम लाइव्हTranslated By: ऑनलाइन लोकमत
सध्या भारतात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. एप्रिल महिन्याच्या १९ तारखेला पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान पार पडणार आहे. त्यानंतर देशाच्या विविध भागांत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांनी बाहेर पडावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जात आहे. सेलिब्रिटी मंडळी आणि उमेदवारदेखील मतदारांना मतदानाविषयी जागरूक करताना दिसत आहेत. मतदानाचा टक्का वाढावा आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी मतदान करावे हाच यामागचा हेतु आहे. याचदरम्यान, एका वृत्तपत्राच्या बातमीचे कात्रण व्हायरल होताना दिसत आहे. त्या कात्रणातील बातमीत असा दावा करण्यात आला आहे की, जे लोक मतदान करणार नाहीत त्यांच्या बँक अकाऊंटमधून ३५० रुपये कापून घेतले जाणार आहेत. अनेक लोक ही बातमी खरी मानून फॉरवर्ड करत आहेत, तसेच सोशल मीडियावरही शेअर करताना दिसत आहेत. कात्रणातील बातमीचे शीर्षक असे आहे की- 'मतदानाच्या दिवशी मतदान केले नाहीत तर अकाऊंटमधून कापले जाणार ३५० रुपये- आयोग'. इतकेच नव्हे तर असेही लिहिण्यात आले की, बँकेत अकाऊंट नसेल तर मोबाईल रिचार्जमधून पैसे कापले जातील आणि यासाठी निवडणूक आयोगाने आधीच कोर्टाकडून मंजूरी घेतलेली आहे.
बूम लाइव्हने या कात्रणाबद्दल आणि बातमीबद्दल अधिक तपास केल्यावर या व्हायरल झालेल्या पेपरच्या कात्रणातील बातमीत काहीही तथ्य नसून ती माहिती खोटी असल्याचे समोर आले. तसेच, हा केवळ एक उपहासात्मक प्रकार असल्याचे समोर आले.
या बातमीच्या कात्रणाचा फोटो आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी जोडून फेसबुकवर शेअर करण्यात आला असून, ‘यूपीच्या जनतेचे अभिनंदन’ असे लिहिले आहे.
त्याचवेळी, दुसऱ्या फेसबुक वापरकर्त्याने कात्रणाच्या बातमीचा हवाला देत लिहिले आहे की, "निवडणूक आयोगाने कोर्टाची मंजुरी घेतली आहे आणि मतदान केले नाही तर बँक खात्यातून 350 रुपये कापले जातील."
येथे पोस्ट पहा
या बातमीचे पेपर कटिंग फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
फॅक्ट चेक
व्हायरल वृत्तपत्र कात्रणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी बूम लाइव्हने सर्वप्रथम बातमीचा अहवाल तपासला. यादरम्यान नवभारत टाइम्सच्या वेबसाइटवर २८ मार्च २०१९ रोजी प्रकाशित झालेला एक लेख सापडला. हा लेख वेबसाइटच्या "हवाबाजी" सदरामध्ये प्रकाशित झालेला दिसला. साधारणपणे, वेबसाइटच्या या विभागात उपहासात्मक लेख प्रकाशित केले जातात.
"हवाबाजी: तुम्ही लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी न गेल्यास, तुमच्या बँक खात्यातून 350 रुपये कापले जातील" या शीर्षकासह प्रकाशित झालेल्या लेखाच्या खाली स्पष्ट शब्दात डिस्क्लेमर नोट आहे - "यात काहीही तथ्य नाही. ही बातमी केवळ एक विनोद आहे. यातून कोणतीही खोटी माहिती परवण्याचा किंवा दुखावण्याचा हेतू नाही."
बूम लाइव्हने आधीच या व्हायरल वृत्तपत्र कात्रणाची सत्यता तपासली आहे. त्यावेळी उपवृत्तसंपादक नवीन कृष्णन यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्यांनी बूम लाइव्हला सांगितले होते, "नवभारत टाइम्समध्ये, दरवर्षी होळीच्या दिवशी व्यंगात्मक बातम्या (Satire News) प्रकाशित करण्याचा आमचा इतिहास आहे. आम्ही प्रत्येक अहवालासोबत आणि अँकर स्टोरीच्या खाली पानावर एक डिस्क्लेमर देखील ठेवला आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की या पानावरील सर्व बातम्या आणि जाहिराती या बनावट किंवा काल्पनिक आहेत. जर कोणी फोटोशॉपच्या मदतीने डिस्क्लेमरचा भाग क्रॉप केला किंवा काढून टाकला तर त्यासाठी आम्हाला दोषी कसे ठरवता येईल?" असेही कृष्णन म्हणाले.
याव्यतिरिक्त, सत्य पडताळणीत 23 मार्च 2019 रोजी भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या संदर्भात एक ट्विट आढळले. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने नवभारत टाईम्सने प्रकाशित केलेल्या 'होळी प्रँक' लेखाला दिशाभूल करणारा लेख असल्याचे म्हटले आहे.
29 नोव्हेंबर 2021 रोजी, भारताच्या निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने त्याच कात्रणाबद्दल पुन्हा ट्विट केले होते आणि त्यास बनावट बातम्या म्हणून संबोधले होते. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, "आमच्या लक्षात आले आहे की खालील खोट्या बातम्या काही व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि सोशल मीडियामध्ये पुन्हा प्रसारित केल्या जात आहेत."
निष्कर्ष-
पोस्टच्या पडताळणीनंतर आम्ही अशा निष्कर्षावर पोहोचलो की व्हायरल पोस्टमधील बनावट आहे. मतदान न केल्यास ३५० रुपये अकाऊंटमधून कापले जाणार हा दावा खोटा आहे.
(सदर फॅक्ट चेक 'बूम लाइव्ह' या वेबसाइटने प्रसिद्ध केले आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)