Created By: NewsChecker Translated By : ऑनलाइन लोकमत
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोशल मीडियावर अभिनेता आमिर खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात आमिर खान जुमलेबाजीविरोधात लोकांना मेसेज देताना दिसतो.
या ३१ सेकंदाच्या या व्हिडिओत अमिर खान लोकांना हिंदीत सांगतो की, मित्रांनो, जर तुम्हाला भारत देश गरीब आहे असं वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण इथला प्रत्येक नागरिक लखपती आहे. प्रत्येकाकडे १५ लाख आहेत. काय सांगता? तुमच्याकडे हे पैसे नाहीत. मग १५ लाख रुपये गेले कुठे? अशा जुमला आश्वासनापासून सावध राहा.
आमिर खानच्या या व्हिडिओच्या शेवटी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि त्याखाली व्होट फॉर न्याय, व्होट फॉर काँग्रेस असा संदेश देण्यात आला आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनं हा व्हिडिओ रिपोस्ट केला आहे. त्यात भारताचा प्रत्येक नागरिक लखपती आहे. कारण सर्वांकडे १५ लाख असायला हवेत. जर तुमच्या खात्यात १५ लाख नसतील मग ते कुठे गेले? त्यामुळे अशा जुमलेबाजीपासून सावध राहा, अन्यथा तुमचे नुकसान होईल, देशहितार्थ जारी असं म्हटलं आहे.
अर्काइव्ह लिंक - येथे क्लिक करा
काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख येतील यावरून जोरदार टीका करत आहेत. अशा विविध बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. ही बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नेमकं यामागचं सत्य काय?
आम्ही जेव्हा या व्हिडिओची पडताळणी केली तेव्हा अमिर खान ओठांची हालचाल आणि मागील ऑडिओ एकमेकांशी जुळत नाही. लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहिला तर शेवटच्या काही सेकंदात तुम्हाला सत्यमेव जयते हा शब्द ऐकायला मिळेल. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये सत्यमेव जयते या आमिर खान याने केलेल्या टीव्ही कार्यक्रमाची म्युझिक असल्याचं लक्षात येते.
हाच धागादोरा पकडून आम्ही सत्यमेव जयतेच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ पाहिले असता अशाच प्रकारे दिसणारा एक व्हिडिओ आढळला. त्यावर Satyamev Jayate Ep 4 Promo- Each Indians is entitiled to one crore या टायटलनं ३० ऑगस्ट २०१६ रोजी हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओ आणि युट्यूबवरील हा व्हिडिओ यातील बॅकग्राऊंडही सारखेच आहे.
मात्र या दोन्ही व्हिडिओतील ऑडिओ सारखे नसल्याचं आढळलं. युट्यूबवरील या व्हिडिओत अभिनेता म्हणतो की, मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल भारत गरीब देश आहे तर तुम्ही चुकीचे आहात. कारण इथला प्रत्येक नागरिक करोडपती आहे. प्रत्येकाकडे किमान १ कोटी आहेत. तुम्ही काय बोलताय? तुमच्याकडे ही रक्कम नाही? तर १ कोटी रुपये कुठे आहेत? हे तुम्हाला येत्या रविवारी कळेल.
यामुळे आमिर खानने ‘जुमला’ विरुद्ध दिलेला इशारा खोटा दाखवण्यासाठी व्हायरल क्लिपमधील ऑडिओ डिजिटल पद्धतीने बदलण्यात आला आहे, असा निष्कर्ष निघतो.
सत्यमेव जयते यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून युट्यूब प्रोमोची लिंकही २३ मार्च २०१४ रोजी शेअर करण्यात आली आहे. परंतु ही लिंक उघडली जात नाही. त्यावरील फोटो पाहिला तर तो २०१६ मध्ये अपलोड व्हिडिओसारखाच आहे. हा व्हिडिओ सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवर Kings Every Day टायटलचा प्रोमो म्हणून अपलोड करण्यात आला आहे.
Kings Every Day या सत्यमेव जयते कार्यक्रमाचा पूर्ण एपिसोड २३ मार्च २०१४ रोजी अपलोड करण्यात आला आहे. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हटलंय की, लोकशाहीच्या भरभराटीसाठी पाच वर्षांतून एकदा मतदान करणे पुरेसे नाही; सरकारी यंत्रणेशी नियमितपणे नागरिकांनी भाग घेतला आहे. शाश्वत दक्षता ही लोकशाहीची किंमत असेल, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की ते आपल्या कार्याचे मूल्यमापन करा. तरीही, आपल्यापैकी बहुतेकजण टीका करण्यात बराच वेळ घालवतात.”
आमिर खान यानेही या व्हिडिओवर भाष्य केले आहे. आमिर आणि त्याच्या टीमला हे कळताच त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये FIR नोंदवला आहे. याविषयी आमिर खानने अधिकृत वक्तव्य जाहीर केलंय की, "माझ्या ३५ वर्षांच्या कारकीर्दीत मी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार केला नाही." हा डीपफेक व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी आमिरने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलीस आरोपींवर कारवाई करणार का हे पाहायचं आहे.
Fact Check/Verification
निष्कर्ष - व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत सत्यमेव जयतेचा व्हिडिओ वापरून त्यात चुकीच्या पद्धतीने ऑडिओ बदलून आमिर खान काँग्रेसचा प्रचार करत असल्याचं खोटं दाखवण्यात आलं आहे.
सदर फॅक्ट चेक 'न्यूज चेकर' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.