मोदी सरकार आता देशातील सर्व बेरोजगारांना दरमहा ३,५०० रुपये देणार असल्याचा मेसेज तुम्हालाही आला असेल तर थांबा. यामागचं सत्य जाणून घेण्याची गरज आहे. अशा पद्धतीची खोटी माहिती देऊन तुमच्यासोबत कुणीही फ्रॉड करण्याची शक्यता आहे. मोदी सरकार बेरोजगारांना ३,५०० रुपयांची दरमहा मदत करणार असल्याचा मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता PIBच्या Fact Checkनं यामागचं सत्य सर्वांसमोर आणलं आहे.
कोरोना महामारी दरम्यान देशातील बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली होती. पण याच दरम्यान एक मेसेज सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता की मोदी सरकारकडून बेरोजगारांना दरमहा ३,५०० रुपयांची मदत केली जाणार आहे. भारत सरकार पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना सुरू करणार असल्याचं असा दावा व्हायरल मेसेजमधून करण्यात आला होता. पण अशी कोणत्याही पद्धतीची योजना मोदी सरकारनं लागू केलेली नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे.
पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेसाठी प्री-रजिस्ट्रेशन सुरू झाल्याचाही मेसेज व्हायरल झाला आहे. यात बेरोजगार तरुणांना दरमहा ३,५०० रुपये आर्थिक मदत मिळविण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. यासाठी एका लिंकवर क्लिक करुन आपली वैयक्तिक माहिती भरण्यास संबंधित व्हायरल मेसेजमध्ये सांगितलं गेलं आहे.
PIB FactCheck नं केली पोलखोल!पीआयबीच्या फॅक्टचेक टीमनं या मेसेजची पोलखोल केली आहे. "पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत भारत सरकार सर्व बेरोजगारांना दरमहा ३,५०० रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती व्हायरल केली जात आहे. पण संबंधित मेसेज पूर्णपणे खोटा असून अशापद्धतीची कोणतीही योजना सरकारनं आणलेली नाही. त्यामुळे अशापद्धतीच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये. यातून तुमची फसवणूक केली जाऊ शकते", असं PIBनं म्हटलं आहे.