Created By: BOOMTranslated By: ऑनलाइन लोकमत
Fact Check: अलीकडेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. दुबईत झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तावर सहज विजय मिळवला. चॅम्पियन्स ट्रॉफी अंतर्गत दुबईमध्ये नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रेक्षक मागून बाबर आझमला ट्रोल करताना दिसत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओसोबतच सोशल मीडिया युझर्सकडून असा दावा केला जात आहे की, बाबर आझमला ट्रोल करण्याची ही घटना नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान घडली, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानला सहा गडी राखून पराभूत केले. या व्हिडिओसंदर्भात फॅक्ट चेक केले असता, हे प्रकरण जुने असल्याचे आढळून आले. याचा भारत-पाकिस्तान सामन्याशी काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ १६ नोव्हेंबर २०२४चा आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया टी-२० सामन्यादरम्यान बाबर आझमला प्रेक्षकांनी ट्रोल केले होते.
व्हायरल व्हिडिओमध्ये, काही प्रेक्षक सामन्यादरम्यान बाबर आझमला ट्रोल करत असून, त्याला टी-२० मध्ये स्थान नाही, असे सांगत फिरकी घेतल असल्याचे पाहायला मिळत आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताना एका युझरने लिहिले आहे की, पाकिस्तानी चाहते बाबर आझमचा खूप अपमान करत होते... #INDvsPAK.
पोस्टची अर्काइव्ह लिंक
फॅक्ट चेक करताना काय आढळून आले?
व्हायरल झालेल्या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करण्यात आला. याद्वारे, १७ नोव्हेंबर २०२४ रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला तोच व्हिडिओ सापडला, ज्यावरून स्पष्ट झाले की, हा नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतर्गत झालेल्या सामन्याचा व्हिडिओ नाही. जेव्हा व्हायरल व्हिडिओ बारकाईने पाहिला तेव्हा आम्हाला असेही आढळले की, स्टेडियमच्या आतील डिस्प्ले बोर्डवर 'सिडनी क्रिकेट ग्राउंड' लिहिलेले होते, जे ऑस्ट्रेलियामध्ये आहे. याशिवाय, असेही आढळले की, व्हायरल व्हिडिओमध्ये बाबर आझमने घातलेली जर्सी सध्या सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानच्या अधिकृत जर्सीपेक्षा वेगळी आहे.
या मिळालेल्या माहितीनंतर, संबंधित कीवर्ड वापरून बातम्यांचे रिपोर्ट्स पडताळून पाहिले. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्यादरम्यान बाबर आझमच्या या ट्रोलिंगबद्दल आम्हाला असे अनेक रिपोर्ट्स सापडले. टाइम्स ऑफ इंडियाच्या १७ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, या सामन्यात बाबर आझमला बरीच टीका सहन करावी लागली. या वृत्तानुसार, पहिल्या डावात पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम बाऊंड्रीवर फिल्डिंग करायला उभा असताना प्रेक्षकांच्या एका ग्रुपने त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. ओरडून सांगायला लागले की, "थोडी लाज बाळगा! टी-२० मध्ये तुम्हाला जागा नाही - परत जा."
दरम्यान, पाकिस्तानी एआरवाय न्यूजनेही या व्हिडिओचे वृत्त दिले आहे. यात क्रिकेटपटू इमाम-उल-हक यांचे विधान समाविष्ट आहे. इमाम-उल-हकने त्यांच्या वक्तव्यात बाबर आझमला पाठिंबा दिला होता. "एक राष्ट्र म्हणून आपण अपयशी ठरलो आहोत. पाठिंबा देण्याऐवजी आपण त्यांची थट्टा करतो. बाबर, तू अजूनही चॅम्पियन आहेस", असे त्याचे म्हणणे रिपोर्ट्सच्या हवाल्याने देण्यात आले आहे.
(सदर फॅक्ट चेक BOOM या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)