Created By: Vishvas news Translated By: ऑनलाईन लोकमत
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा एक व्हिडीओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. काही युजर्स हा व्हिडीओ शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की, ते दोघेही महाकुंभमध्ये पोहोचले आहेत आणि हा व्हिडीओ तिथला आहे.
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचं आढळलं. खरंतर व्हायरल झालेला व्हिडीओ अबू धाबीच्या स्वामीनारायण अक्षरधाम (BAPS) मंदिराचा आहे, जो आता महाकुंभमेळ्याचा म्हणून शेअर केला जात आहे.
काय व्हायरल होत आहे?
फेसबुक युजर 'Rdx Bhaltu Kumar' याने १३ फेब्रुवारी २०२५ रोजी व्हिडीओ शेअर केला (अर्काइव्ह लिंक) आणि लिहिलं, "सुपरस्टार टायगर आणि अक्षय कुमार महाकुंभाला आले आहेत."
इन्स्टाग्राम युजर its_chhotu65 ने देखील हा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिलं, "टायगर श्रॉफ, अक्षय कुमार प्रयागराज"
तपास
सर्वप्रथम आम्ही संबंधित कीवर्ड वापरून गुगलवर सर्च केलं. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ महाकुंभाला गेल्याची आम्हाला कुठेही बातमी मिळाली नाही.
तपास पुढे नेत आम्ही व्हायरल व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेतले आणि गुगल लेन्सद्वारे ते शोधलं. आम्हाला दैनिक जागरणच्या वेबसाइटवर व्हिडिओशी संबंधित बातमी सापडली. हा रिपोर्ट ९ एप्रिल २०२४ रोजी प्रकाशित केला आहे. दिलेल्या माहितीनुसार, "हा व्हिडिओ 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या प्रमोशनचा आहे, जेव्हा अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अबू धाबीमधील प्रसिद्ध हिंदू मंदिर अक्षरधाम (BAPS) ला भेट दिली होती. तोच व्हिडीओ आता महाकुंभमेळ्याचा असल्याचा दावा करत शेअर केला जात आहे.
सर्च दरम्यान, व्हायरल व्हिडिओशी संबंधित फोटो baps.org या वेबसाइटवर आढळला. व्हायरल व्हिडिओशी संबंधित फोटो ८ एप्रिल २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या लेखात पाहता येतील. तो अबू धाबी येथील बीएपीएस अक्षरधाम मंदिराचा असल्याचं सांगितलं जात आहे.
अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनीही त्यांच्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. ९ एप्रिल २०२४ रोजी केलेल्या पोस्टमध्ये, हा व्हिडिओ अबू धाबी अक्षरधाम (BAPS) हिंदू मंदिराचा असल्याचं म्हटलं आहे.
व्हायरल व्हिडीओशी संबंधित बातम्या येथे वाचा.
व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी, आम्ही प्रयागराज येथील दैनिक जागरणचे संपादकीय प्रभारी राकेश पांडे यांच्याशी संपर्क साधला. त्याच्यासोबत व्हायरल व्हिडिओ शेअर केला. त्यांनी सांगितलं की, व्हायरल झालेला व्हिडीओ महाकुंभमेळ्याचा नाही. व्हिडिओमध्ये दिसणारं बॅकग्राऊंड इथलं नाही.
महाकुंभाच्या आधीही सोशल मीडियावर अनेक खोटे आणि दिशाभूल करणारे दावे व्हायरल झाले आहेत. ज्याचा तथ्य तपासणी अहवाल विश्वास न्यूजच्या वेबसाइटवर वाचता येईल.
शेवटी आम्ही व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरचे अकाउंट स्कॅन केले. आम्हाला आढळलं की युजरचे १४ हजार फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ महाकुंभाला जातानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. विश्वास न्यूजने तपास केला आणि व्हायरल दावा खोटा असल्याचं आढळलं. महाकुंभमेळ्याचा असल्याचा दावा केला जाणारा व्हिडीओ प्रत्यक्षात अबू धाबीतील स्वामीनारायण अक्षरधाम (BAPS) मंदिरातील २०२४ सालचा आहे. जेव्हा दोन्ही कलाकारांना त्यांच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अबू धाबीतील मंदिराला भेट दिली होती. तोच व्हिडीओ आता महाकुंभाच्या नावाखाली अलीकडील असल्याचं सांगून खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
(सदर फॅक्ट चेक Vishvas news या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)