Created By: Vishvas NewsTranslated By: ऑनलाईन लोकमत
बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तो पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करताना आणि त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. देशात नुकत्याच झालेल्या निवडणुकांशी जोडून हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. तसेच ते यामध्ये काँग्रेसच्या समर्थनार्थ बोलत असून भाजपाच्या अपयशाबद्दल सांगितल्याचा दावा केला जात आहे.
विश्वास न्यूजला आपल्या तपासणीत असं आढळलं की, व्हायरल होणारा दावा हा दिशाभूल करणारा आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ अलीकडचा नसून पाच वर्षे जुना आहे. जेव्हा असरानी हे निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी अरुणाचल प्रदेशात पोहोचले होते आणि तेथे रॅली काढली होती.
काय व्हायरल होत आहे?
फेसबुक युजर 'जनता का अधिकार : Unofficial' ने २३ नोव्हेंबर २०२४ रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर करताना "असरानी भाजपाची काम सांगत आहेत." असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
पोस्टची अर्काइव्ह लिंक येथे पाहा.
तपास
व्हायरल व्हिडीओचं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही संबंधित कीवर्डच्या मदतीने Google वर शोधलं. आम्हाला इन्फिनिटी इन्फो नावाच्या Facebook पेजवर व्हिडिओचं मोठं व्हर्जन सापडलं. हा व्हिडीओ २२ एप्रिल २०१९ रोजी शेअर करण्यात आला होता. उपलब्ध माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडीओ अरुणाचल प्रदेशमधील एका निवडणूक रॅलीचा आहे. व्हायरल व्हिडीओ भाग ७.४५ पासून पाहता येऊ शकतो.
तपासादरम्यान, आम्हाला पॉलिटिकल हबच्या YouTube चॅनेलवर समान माहितीसह व्हायरल व्हिडिओचं व्हर्जन सापडलं. २३ एप्रिल २०१९ रोजी व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.
आम्हाला अरुणाचल प्रदेश २४ च्या वेबसाइटवर व्हिडिओशी संबंधित रिपोर्ट सापडला. हा रिपोर्ट ७ एप्रिल २०१९ रोजी प्रकाशित झाला. उपलब्ध माहितीनुसार, काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि बॉलिवूड अभिनेता असरानी यांनी अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या समर्थनार्थ रॅली काढली आणि उमेदवारांसाठी मतं मागितली. तसेच भाजपा आणि पंतप्रधान मोदींच्या आश्वासनांवर टीका केली होती.
याबाबत आम्ही उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्याशी बोललो. त्यांनी हा व्हिडीओ सुमारे पाच वर्षे जुना आणि अरुणाचल प्रदेश निवडणुकीच्या काळातील असल्याचं सांगितलं.
शेवटी, आम्ही दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजर्सचं अकाऊंट स्कॅन केलं. जवळपास १६ हजार लोक युजर्सला फॉलो करतात. युजर एकाच विचारधारेशी संबंधित पोस्ट शेअर करतो.
निष्कर्ष
विश्वास न्यूजला आपल्या तपासात असं आढळून आलं आहे की, बॉलिवूड अभिनेते असरानी यांच्या व्हायरल व्हिडीओबाबत पंतप्रधान मोदींवर टीका करणारा दावा दिशाभूल करणारा आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ अलीकडचा नसून पाच वर्षे जुना आहे. जेव्हा असरानी हे निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आले होते आणि तेथे रॅली काढली होती.
(सदर फॅक्ट चेक Vishvas News या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)