CM Eknath Shinde ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज २८८ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक प्रचाराची मुदत सोमवारी सायंकाळीच संपली असली तरी अगदी मतदानाच्या दिवशीही काही उमेदवारांकडून प्रचाराचा प्रयत्न झाला. अशातच अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा न देत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ 'लोकमत'चं नाव, लोगो आणि टेम्पलेट वापरून व्हायरल करण्यात आला आहे. मात्र असा कोणताही व्हिडिओ 'लोकमत'कडून प्रसिद्ध करण्यात आला नव्हता. 'लोकमत'चे नाव वापरून याद्वारे मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहमदपूर-चाकूर मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांच्या शिट्टी या चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. "पाच नंबरला शिट्टी ही निशाणी आहे. ही शिट्टी एवढी वाजली पाहिजे की बाकीच्या सगळ्या उमेदवारांची शिट्टी-पिट्टी झाली पाहिजे," असं या व्हायरल व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शिंदे हे म्हणताना दिसत आहेत. मात्र 'लोकमत'च्या नावाने व्हायरल करण्यात आलेला हा व्हिडिओ दिशाभूल करणारा असून 'लोकमत'चे नाव आणि लोगोचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे.
दरम्यान, अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी या व्हिडिओसंदर्भात चाकूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.