देशात दिवाळीचा सण काही दिवसातच सुरू होईल. आपल्याकडे दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, फटाक्यांची मोठी आतिषबाजी असते. या पार्श्वभूमीवर फटाक्यांबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे. या मेसेजमध्ये पाकिस्तान आणि चीन मिळून आजार पसरवणारे फटाके बनवून भारतात पाठवत असल्याचे सांगितले आहे. हा असाच मेसेजर सोशल मीडियावर प्रत्येक वर्षी व्हायरल होतो. या मेसेजमुळे बाजारात गोंधळ उडाला आहे. दरम्यान, आता केंद्राने या मेसेजमागील सत्य सांगितलं आहे.
व्हायरल मेसेजमध्ये काय आहे?
सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, 'गुप्तचर माहितीनुसार, पाकिस्तानभारतावर थेट हल्ला करू शकत नसल्याने त्याने भारताकडून बदला घेण्याची मागणी केली आहे. चीनने भारतात दमा पसरवण्यासाठी खास फटाके बनवले आहेत, जे कार्बन मोनोऑक्साइड वायूपेक्षाही विषारी आहेत.याशिवाय भारतात, डोळ्यांच्या आजारांच्या प्रसारासाठी विशेष प्रकाश सजावटीचे दिवे देखील तयार केले जात आहेत. ज्यामुळे अंधत्व येते. पारा मोठ्या प्रमाणाात वापरला गेला आहे. कृपया या दिवाळीत जागरुक रहा आणि या चायनीज उत्पादनांचा वापर करु नका. हा संदेश सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवा, असं या मेसेजमध्ये म्हटले आहे. यामुळे चीनी फटाक्यांवर बंदीचे मेसेज व्हायरल झाले आहेत. या मेसेज मागीस सत्य केंद्राने सांगितले आहे.
केंद्र सरकारने काय सांगितले?
हा मेसेज खोटा असल्याचे पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटने स्पष्ट केले आहे. व्हायरल पोस्टच्या स्क्रीनशॉटसह, पीआयबीने म्हटले आहे की, 'गृहमंत्रालयाच्या एका कथित अधिकाऱ्याच्या नावाने व्हायरल होत असलेल्या संदेशाने असा दावा केला आहे की, चीन दमा पसरवण्यासाठी आणि डोळ्यांचे आजार पसरवण्यासाठी विशेष प्रकारचे फटाके आणि सजावटीचे दिवे भारतात पाठवत आहे. असल्याचे, हे सर्व चुकीचे आहे. हा दावा खोटा आहे, गृहमंत्रालयाने अशा कोणत्याही सूचना पाठवलेल्या नाहीत, असं पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.