Created By: BoomTranslated By: ऑनलाइन लोकमत
क्लेम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता.
फॅक्ट चेकमनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेत राहुल गांधी ट्रकमध्ये बसल्याचे बूमला आढळले. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी निगमबोध घाटावर त्यांना श्रद्धांजली वाहिली.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगमबोध घाटावर राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता, असा दावा सोशल मीडियावर काही लोकांनी केला आहे.
मात्र हा दावा खोटा असल्याचे BOOM ला आढळले. मनमोहन सिंग यांच्या काँग्रेस मुख्यालय ते निगम बोध घाट या अखेरच्या प्रवासादरम्यान राहुल गांधी लष्कराच्या वाहनात उपस्थित होते. याशिवाय मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी निगम बोध घाटावर पोहोचून त्यांना अखेरचा निरोप दिला.
एक्सवर पोस्ट करत उजव्या विचारसरणीच्या युजरने म्हटलं की, "सोनिया गांधींना राहू द्या, मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराला राहुल आणि प्रियंकाही उपस्थित नव्हते. काँग्रेसच्या कुटुंबातील नसलेल्या सदस्यांची हीच अवस्था आहे. शीख मनमोहन सिंग असोत, बंगाली ब्राह्मण प्रणव दा असोत, ओबीसी सीताराम केसरी असोत किंवा तेलुगु पीव्हीएनआर असोत, ते त्यांच्याकडे सेवक म्हणून पाहतात."
एक्सवर मनमोहन सिंग यांच्या शेवटच्या प्रवासाचा व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने म्हटलं की, "सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त, मनमोहन सिंग यांच्या शेवटच्या प्रवासात कोणीही दिसणार नाही. काँग्रेसचा एकही माणूस आला नाही, काँग्रेसला फक्त बनावट गांधींमध्येच रस आहे."
फॅक्ट चेक
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर २८ डिसेंबर २०२४ रोजी दिल्लीतील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी घाटावर पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पंचतत्वात विलीन होण्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. येथून त्यांची अंतिम यात्रा निगमबोध घाटावर पोहोचली.
माध्यमांच्या वृत्तानुसार, मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि रेवंत रेड्डी हे पक्षाच्या मुख्यालयापासून निगमबोध घाटापर्यंत गाडीतून गेले होते. या अंत्ययात्रेत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधीही होत्या.
'राहुल गांधी मनमोहन सिंग यांच्या शेवटच्या प्रवासाला उपस्थित होते' या हेडिंगसह आज तकच्या यूट्यूब चॅनलवर याच्याशी संबंधित एक छोटा व्हिडिओ देखील मिळाला.
याशिवाय एक्सवर Deccan Chronicle ची एक पोस्ट सापडली ज्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शेवटच्या प्रवासात सहभागी झाल्याचे म्हटलं आहे.
यावेळी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पायीच अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी निगमबोध घाट गाठून मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला. काँग्रेसने आपल्या एक्स हँडलवरून याचे फोटो शेअर केले आहेत.
याशिवाय एएनआयच्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी निगमबोध घाटावर श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
एएनआयच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर आणि त्यांची मुलगी दमन सिंग यांच्या व्यतिरिक्त, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी वढेरा निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कारात सहभागी होताना दिसले.
अंत्यसंस्काराच्या वेळी राहुल गांधी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाला खांदा देताना दिसले.
मनमोहन सिंग यांच्या अखेरच्या निरोपाचा संपूर्ण कार्यक्रम काँग्रेसच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पाहता येईल.
(सदर फॅक्ट चेक Boom या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)