Created By: आज तकTranslated By: ऑनलाइन लोकमत
Fact Check : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभाच्या पहिल्या अमृत स्नानाच्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारीला साडेतीन कोटींहून अधिक लोकांनी स्नान केले आणि पहिल्या दोन दिवसांतच स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या ५ कोटी झाली आहे. दरम्यान, एक फोटो शेअर करताना काही सोशल मीडिया यूजर्स म्हणत आहेत की, महाकुंभला आलेल्या या करोडो लोकांमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचेही नाव आहे. फोटोमध्ये अखिलेश पाण्यात उभे आहेत आणि त्यांच्याकडे पाहून फोटो क्लिक होण्यापूर्वीच त्यांनी डुबकी मारल्याचे दिसते.
हा फोटो फेसबुकवर शेअर करताना एका व्यक्तीने म्हटलं की, “सपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अखिलेश यादव यांनी सनातनी हिंदूंना सडेतोड उत्तर देताना कुंभमध्ये स्नान केले. आता सपाला सनातनी हिंदूंची सगळी मते मिळतील, बाबाजींनी अजून आंघोळ केलेली नाही.”
आज तक फॅक्ट चेकमध्ये आढळून आले की हा फोटो महाकुंभाचे नसून हरिद्वारचा आहे जिथे अखिलेश यादव यांनी १४ जानेवारी २०२५ रोजी गंगेत स्नान केले होते.
सत्य कसं समोर आलं?
अखिलेश यादव यांच्यासारखा ताकदवान नेता महाकुंभाला आला असता तर त्याबाबतच्या बातम्या नक्कीच प्रसिद्ध झाल्या असत्या. पण, बऱ्याच शोधा नंतरही कोणतीही बातमी आढळून आली नाही.
रिव्हर्स सर्चच्या मदतीने आम्हाला सापडले की व्हायरल फोटो अखिलेश यादव यांच्या ट्वीटमधील आहे. १४ जानेवारी २०२५ रोजी केलेल्या ट्विटमध्ये या फोटोसोबत आणखी दोन फोटो शेअर करताना अखिलेश यांनी लिहिले होते, “मकर संक्रांतीच्या पवित्र सणानिमित्ताने गंगा मातेचे आशीर्वाद घेतले.”
यानंतर आम्हाला याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्तही मिळाले. यामध्ये सांगितले की, मकर संक्रांतीच्या दिवशी अखिलेश यादव यांनी हरिद्वारमध्ये गंगेत स्नान केल्याचे सांगण्यात येत आहे. ही अखिलेश यांचा वैयक्तिक दौरा होता, ज्याची माहिती हरिद्वारमधील स्थानिक कार्यकर्त्यांनाही देण्यात आली नव्हती. दौऱ्यानंतर त्यांनी त्यांचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये अखिलेश हरिद्वारच्या व्हीआयपी घाटावर गंगेत स्नान करताना दिसत होते.
नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, अखिलेश यादव १४ जानेवारीला उत्तराखंडमधील जॉली ग्रँट विमानतळावर पोहोचले होते आणि त्यानंतर तेथून ते हरिद्वारला रवाना झाले होते. तेथे त्यांनी गंगेत स्नान केले. तसेच नमामि गंगे घाटावर कुटुंबासह नमाज अदा केल्यानंतर काका राजपाल सिंह यादव यांच्या अस्थिकलशाचे गंगेत विसर्जन करण्यात आले. राजपाल यांचे ९ जानेवारी रोजी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.
दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १५ जानेवारीला प्रसारमाध्यमांशी बोलताना अखिलेश यादव यांनी महाकुंभबाबत सरकारवर निशाणा साधला होता. एवढी साधनसामग्री असूनही महाकुंभासाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय होत असून, या त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, असा दावा त्यांनी केला.
त्यांनी म्हटलं, “गंगा हरिद्वारपासून कोलकात्यापर्यंत वाहते, माणूस पाहिजे तिथे गंगेत स्नान करू शकतो, प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे महत्त्व आहे. काल मी हरिद्वारमध्ये होतो आणि संक्रांतीला स्नान केले." प्रयागराजला जाण्याच्या प्रश्नावर अखिलेश यादव म्हणाले की, मी गंगा माता म्हणेल तेव्हाच संगमला जाईन.
२७ जानेवारी २०१९ रोजी अखिलेश यादव आखाडा परिषदेच्या निमंत्रणावरून प्रयागराज येथील कुंभमेळ्यात पोहोचले होते आणि त्यानंतर त्यांनी अर्धकुंभ दरम्यान संगमात स्नान केले होते.
वृत्त लिहेपर्यंत अखिलेश यादव प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात स्नान करण्यासाठी पोहोचलेले नाहीत.
(सदर फॅक्ट चेक आज तक या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)