Created By: Boom Translated By : ऑनलाइन लोकमत
Rahul Gandhi ( Marathi News ) :काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या रोड शोचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरला झाला आहे. हा फोटो नुकत्याच वायनाड इथं झालेल्या राहुल गांधींच्या रोड शोमधील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हायरल फोटोत राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यादेखील दिसत आहे. सदर फोटोमध्ये राहुल गांधींसोबतच्या कार्यकर्त्यांच्या हातात काँग्रेसच्या झेंड्यासह हिरव्या रंगाचे झेंडेही दिसत असून ते झेंडे पाकिस्तानचे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो दिशाभूल करणारा असल्याचं आमच्या तपासणीत सिद्ध झालं आहे. सदर फोटो हा राहुल गांधींच्या नुकत्याच झालेल्या रोड शोचा नसून २०१९ मधील आहे. तसंच राहुल गांधींसोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातातील हिरवे झेंडे हे पाकिस्तानचे किंवा इस्लामिक झेंडे नसून ते केरळमधील इंडियन यूनियन मुस्लीम लीग या राजकीय पक्षाचे झेंडे आहेत.
सोशल मीडियावर काय दावा केला जातोय?
राहुल गांधींच्या जुन्या रोड शोचा फोटो शेअर करत एक्सवर एका यूजरने लिहिलं आहे की, "हा पाकिस्तान नसून भारतातील काँग्रेसची रॅली आहे. त्यांचा संदेश स्पष्ट आहे. त्यामुळे आता तुमचीही निवडही स्पष्ट होईल," असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे.
दरम्यान, भाजप नेते नवीन कुमार जिंदल यांनीही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.
फॅक्ट चेक
व्हायरल फोटोमागील सतत्या जाणून घेण्यासाठी आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यानंतर द न्यू इंडियन एक्स्प्रेसचे एक वृत्त आढळून आले. ५ एप्रिल २०१९च्या या वृत्तात आता व्हायरल होत असलेला फोटो आढळून आला. या वृत्तात लिहिण्यात आलं आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कलपेट्टा इथं रोड शो केला. या रोड शोमध्ये काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यादेखील उपस्थित होत्या. या वृत्तानुसार स्पष्ट झालं की, आता व्हायरल होत असलेला फोटो २०१९च्या रोड शोचा असून तो दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे.
आम्हाला एक्सवर अॅडव्हान्स सर्चच्या मदतीने काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरही ४ एप्रिल २०१९ रोजीच्या पोस्टमध्ये व्हायरल फोटोशी मिळताजुळता फोटो आढळून आला.
दरम्यान, वायनाड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ३ एप्रिल रोजी राहुल गांधींनी आपला अर्ज भरला. देशात एकूण सात टप्प्यांत मतदान होणार असून वायनाड लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र यंदा उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल गांधींनी काढलेल्या रोड शोमध्ये इंडियन यूनियन मुस्लीम लीग या राजकीय पक्षाचे झेंडे गायब असल्याचं आम्हाला आढळून आलं.
सदर फॅक्ट चेक Boom या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.