Created By: आज तकTranslated By : ऑनलाइन लोकमत
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर मागील काही दिवसांपासून देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओचा आधार घेत विरोधकांकडून शाह यांना लक्ष्य केलं जात आहे. "अमित शाह यांनी देश तोडण्याची भाषा केली," असा दावा या व्हिडिओच्या आधारे केला जात आहे. "दक्षिण भारत आणि उत्तर भारत असे या देशाचे दोन तुकडे व्हायला हवेत," असं या व्हायरल व्हिडिओत अमित शाह यांनी म्हटल्याचं दिसत आहे.
अमित शाह यांचा हा व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर एका यूजरने म्हटलं आहे की, "एकीकडे श्री. अखिलेश आणि श्री. राहुल गांधी हे संपूर्ण देशाला एकत्र करत आहेत. हिंदू-मु्स्लीम-शीख-ईसाई या सर्व धर्मांना सोबत घेऊन चालत आहेत. मात्र ही व्यक्ती देशाचे तुकडे व्हायला हवेत, असं म्हणत आहे. दक्षिणेत जागृकता जास्त असल्याने हे लोकं जिंकू शकत नाहीत. जो देशाचे तुकडे करेल त्याचे आम्ही तुकडे करू. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी किती पातळी सोडणार आहात?" असा सवाल करत सदर यूजरने अमित शाह यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
मात्र आम्ही केलेल्या फॅक्ट चेकमध्ये सोशल मीडिया यूजरने अमित शाह यांच्याबाबत केलेला दावा असत्य असल्याचे आढळून आले आहे. अमित शाह यांनी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. काँग्रेसवर निशाणा साधत अमित शाह यांनी म्हटलंय की, "दक्षिण आणि उत्तर असं देशाचं विभाजन व्हायला हवं, अशी काँग्रेसची पॉलिसी आहे." मात्र शाह यांचा याबाबतचा अर्धवट व्हिडिओ शेअर करत संभ्रम निर्माण केला जात आहे.
कसं समोर आलं सत्य?
व्हायरल व्हिडिओत अमित शाह यांच्या हातात News18 या वृत्तवाहिनीचा माइक दिसत आहे. याबाबतची माहिती घेत आम्ही कीवर्ड सर्च केला तेव्हा News18च्या एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ CNN News18 च्या यूट्यूब चॅनलवर आढळून आला. हा व्हिडिओ २० मार्च २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओत २ तास ४० मिनिटांनंतर अमित शाह नेमक्या कोणत्या मुद्द्यावर भाष्य करत आहेत, हे स्पष्ट होतं.
अँकरने काँग्रेस नेत्याच्या एका वादग्रस्त वक्तव्याविषयी प्रतिक्रिया विचारल्यानंतर अमित शाह यांनी म्हटलं होतं की, "हे बघा याचं उत्तर तर राहुलजींनी द्यायला हवं. आजपर्यंत काँग्रेसने त्या नेत्याच्या वक्तव्यापासून स्वत:ला वेगळं केलेलं नाही. देशाचं दक्षिण आणि उत्तर असं विभाजन व्हायला हवं, अशी काँग्रेसची पॉलिसी असल्याचा समज देशातील जनतेचा होत आहे. मात्र आता भाजप इतका बलवान आहे की, काँग्रेसला दुसऱ्यांदा या देशाची फाळणी करू देणार नाही. आम्ही कधीही या देशाचे तुकडे होऊ देणार नाही."
दरम्यान, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे की, गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ अर्धवट असून त्यांच्याबाबत केलेला दावा खोटा आहे. सदर फॅक्ट चेक आज तक या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.