Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 01:40 PM2024-05-25T13:40:49+5:302024-05-25T13:50:43+5:30
Fact Check: अमित शाह यांनी मोदींच्या बाबतीत म्हटलं की, ते निवडणुकीत गॅरंटी देतात आणि नंतर विसरतात. मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे.
Created By: आजतक
Translated By: ऑनलाइन लोकमत
लोकसभा निवडणुकीदरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये "मी म्हणतो की, गॅरंटीला काही अर्थ नाही, ते निवडणुकीपर्यंत बोलतात आणि नंतर विसरतात" असं म्हटलं आहे. सोशल मीडिया युजर्सच्या मते, अमित शाह यांची ही टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आहे.
व्हिडीओ शेअर करताना एका फेसबुक युजरने लिहिलं की, “अमित शाहजींनी घोटाळ्याचा हा अविष्कार शोधून काढला होता, आता ते म्हणत आहेत की, गॅरंटीला काही अर्थ नाही. ते निवडणुकीपर्यंत बोलतात आणि नंतर विसरतात, एकंदरीत त्यांना पंतप्रधानपदाची खुर्ची स्वत: काबीज करायची आहे. आधी त्यांनी मोदींना फसवलं, आता गॅरंटीचीही वाट लावली". या पोस्टचं अर्काइव्ह व्हर्जन येथे पाहता येईल.
आजतक फॅक्ट चेकमध्ये असं आढळून आलं की व्हायरल व्हिडीओ हा अपूर्ण आहे, प्रत्यक्षात अमित शाह यांनी हे विधान पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर काँग्रेस पक्षाविषयी केलं होतं.
कसं कळलं सत्य?
व्हायरल व्हिडिओचे कीफ्रेम्स रिव्हर्स सर्च केल्यानंतर आम्हाला अमित शाह यांची मुलाखत सापडली जी ANI च्या अधिकृत YouTube चॅनेलवर 15 मे 2024 रोजी अपलोड करण्यात आली होती. या मुलाखतीत अमित शाह पाकव्याप्त काश्मीर, काँग्रेस पक्ष अरविंद केजरीवाल-स्वाती मालीवाल, ममता बॅनर्जी आणि लोकसभा निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर बोलतात.
एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी अमित शाह यांना निवडणुकीतील काँग्रेसच्या हमीभावाबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं. "मी नुकताच तेलंगणाला गेलो होतो. तिथल्या महिला आमचे 12,000 रुपये कधी येतील याची वाट पाहत आहेत. शेतकरी 2 लाखाच्या कर्जमाफीची वाट पाहत आहेत. तिथल्या मुली स्कूटरची वाट पाहत आहेत, राहुलजींनी दिलेलं वचन त्यांची गॅरंटी होती, आता तुम्ही राहुलजींना शोधा" असं म्हटलं आहे.
स्मिता प्रकाश म्हणाल्या की, दक्षिणेत निवडणुका संपल्या आहेत आणि राहुल जी आता उत्तरेत आले आहेत. यानंतर शाह व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील हे विधान करतात. ते म्हणतात, "पण दक्षिणेत असतानाही ते जायचे, म्हणूनच मी म्हणतो की गॅरंटी देण्यात अर्थ नाही, ते निवडणुकीपर्यंत बोलतात आणि नंतर विसरतात." काँग्रेस पक्षावर केलेली त्यांची ही टिप्पणी 25:35 वर ऐकता येऊ शकते.
यावरून व्हायरल क्लिप अपूर्ण असल्याचं सिद्ध होतं.
निवडणुकीच्या वेळी गॅरंटी द्यायची आणि नंतर विसरायचं हे अमित शाह यांचं विधान पंतप्रधान मोदींसाठी नसून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींसाठी होतं हे स्पष्ट आहे.
(सदर फॅक्ट चेक आजतक या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)