Created By: NewscheckerTranslated By: ऑनलाइन लोकमत
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या तीन टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. तर आता पुढील टप्प्यांच्या तयारीला सर्व पक्ष लागले आहेत. ज्या भागात मतदान झाले आहे, तेथील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आता अन्य ठिकाणी आपला हातभार लावताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे तीव्र होताना पाहायला मिळत आहे. यातच सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत असून, यामध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने मतदान करणाऱ्या मुस्लीम बांधवांना आर्थिक मदत जाहीर केल्याचे बोलले जात आहे.
मुस्लीम बांधवांना मदत करण्याचा दावा करणारे हे पत्र दुबईच्या एका मुस्लिम संघटनेकडून आल्याचे बोलले जात आहे. परंतु, हे पत्र बनावट असल्याचे आता समोर येत आहे. यासाठी आम्ही काही तपास केला. आम्ही केलेल्या तपासणीत आढळून आले की, व्हायरल पत्र बनावट आहे. पत्रात दिलेला मोबाईल क्रमांक आणि पत्ता या कथित संघटनेचा नाही. उल्लेखनीय आहे की लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान झाले. या कालावधीत लोकसभेच्या ९३ जागांवर मतदान झाले, त्यापैकी गुजरातमधील २५ जागा, कर्नाटकात १४ जागा, महाराष्ट्रात ११ जागा, उत्तर प्रदेशात १० जागा, मध्य प्रदेशात ९, छत्तीसगडमध्ये ७ आणि बिहारमधील ५ जागा आणि इतर अनेक राज्यांतील काही जागांचाही समावेश होता. या कालावधीत सुमारे ६२.१ टक्का मतदान झाले.
व्हायरल पत्राच्या शीर्षस्थानी “Association of Sunni Muslims” असे इंग्रजीत लिहिले आहे आणि त्याखाली त्याचे भाषांतरही हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे. याशिवाय, पत्ता आहे “#2-11th street, Khalid Bin Walid Road, Plot no. Umm Hurair One, Dubai, United Arab Emirates” आणि जारी करण्याची तारीख २९ एप्रिल २०२४ अशी लिहिली आहे.
तीन वेगवेगळे मोबाईल क्रमांकही जारी करण्यात आले
पत्रातील इंग्रजी आणि उर्दू मजकुराच्या मराठी भाषांतरात असे लिहिले आहे की, असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिम (दुबई) ने ७ मे रोजी कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये भारतीय निवडणुकीत मतदान करणाऱ्या मुस्लीम बांधवांसाठी तिकीट बुकिंग आणि प्री-बुक केलेल्या तिकिटांचा संपूर्ण परतावा जाहीर केला आहे. आर्थिक मदत जाहीर केली आहे. या निवडणुकांमध्ये फॅसिस्ट शक्तींचा पराभव करून मुस्लीम समाजाचा खरा मित्र असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय पत्रात कर्नाटकातील हुबळी, कारवार आणि शिमोगा जिल्ह्यातील लोकांसाठी तीन वेगवेगळे मोबाईल क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. व्हायरल पोस्टचे संग्रहण येथे पाहिले जाऊ शकते.
अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची आम्हाला विनंती करण्यात आली. व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, सर्वप्रथम पत्रात उपस्थित असलेल्या मुस्लिम संघटनेचा शोध घेतला. यावेळी, इंटरनेटवर असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिम ऑर्गनायझेशन ऑफ दुबईशी संबंधित कोणतीही माहिती मिळाली नाही. यानंतर, व्हायरल पत्रातील पत्त्याच्या मदतीने त्या संस्थेचा शोध घेतला आणि हा पत्ता संयुक्त अरब अमिरातीची राजधानी दुबई येथे असलेल्या पाकिस्तानी दूतावासाच्या मुख्यालयाचा असल्याचे आढळले.
कॉफी विकणाऱ्या कंपनीचा क्रमांक
आमचा तपास पुढे नेत, व्हायरल पत्रात उपस्थित असलेल्या क्रमांकांवर संपर्क साधला. व्हॉट्सॲपच्या मदतीने पत्राच्या शीर्षस्थानी असलेल्या क्रमांकावर संपर्क साधला, जो कथितरित्या मोहम्मद फैयाज नावाच्या व्यक्तीचा होता. या वेळी आम्हाला आढळून आले की, हा नंबर डॅलमायर या कॉफी मशीन विकणाऱ्या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत आहे. आम्हाला कंपनीचे इन्स्टाग्राम अकाउंटही सापडले. हा क्रमांक या खात्याच्या बायोमध्ये आहे, जो व्हायरल पत्रातही आहे.
पत्रावरील क्रमांक बनावट
त्या कंपनीशीही संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट केले की, आम्ही पत्रात नमूद केलेल्या संस्थेशी संबंधित नाही. या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही. आमच्या तपासात, आम्ही व्हायरल पत्रात उपस्थित असलेल्या इतर दोन्ही क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.
निष्कर्ष
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले की व्हायरल पत्र बनावट आहे, कारण पत्रात दावा केलेल्या संस्थेची माहिती इंटरनेटवर उपलब्ध नाही.
(सदर फॅक्ट चेक Newschecker या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)