नवी दिल्ली – सध्या सोशल मीडियाच्या युगात अनेक गोष्टी काही सेकंदात जगभरात व्हायरल होतात. कोरोनाच्या या काळात चुकीच्या गोष्टी खातरजमा न करता पुढे फॉरवर्ड केल्या जातात. असाच काहीसा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मेसेज तुम्हीही पाहिला असेल ज्यात भारत सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत देशात लॉकडाऊन करणार असल्याची घोषणा केल्याचा दावा करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर फिरणारा हा मेसेज पूर्णपणे चुकीचा आणि खोटा असून कुणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये. देशात लॉकडाऊन होणार असल्याची अफवा असल्याचं PIB फॅक्ट चेकद्वारे सांगण्यात आले आहे. PIB फॅक्ट चेकने त्यांच्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, सोशल मीडियावर सध्या एक फेक फोटो व्हायरल केला जात आहे. ज्यात ३१ डिसेंबरपर्यंत भारतात लॉकडाऊन घोषित केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारने अद्याप लॉकडाऊनबाबत कुठलीही घोषणा केली नाही असं PIB ने सांगितले आहे.
कृपया अशा चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तसेच त्या इतरांना शेअर करु नका. जर तुमच्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असा मेसेज पाहायला मिळत असेल तर त्यांनाही याची दक्षता घेण्यास सांगा असं आवाहन पीआयबीनं केले आहे. ही पूर्णपणे खोटी आणि बनावट बातमी आहे. काही समाजकंटक अफवा पसरवून न्यूज व्हायरल करतात. त्यापासून सावध राहणं गरजेचे आहे. अशा मेसेजमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन गोंधळ माजू शकतो.
कोरोना महामारीच्या काळात अनेकजण स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर जास्त वेळ घालवतात. अशावेळी सायबर गुन्हेगार त्याचा फायदा उचलतात. लोकं फसवणूक आणि चुकीच्या गोष्टींना बळी पडतात. या काळात बनावट बातम्या देण्याचे प्रकरण वाढले आहे. त्यासाठी सोशल मीडियावर कुठल्याही माहितीशिवाय मेसेज फॉरवर्ड करु नका. जर तुम्हाला अशा कोणत्या मेसेजवर संशय असेल तर तुम्हीही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरुन त्याची खातरजमा करु शकतात. त्यामुळे तुम्ही चुकीच्या गोष्टी पसरवण्याचे शिकार होणार नाही. PIB फॅक्ट चेक हे सरकारबाबत पसरणाऱ्या बातम्यांवर पडताळणी करुन त्यामागचं व्हायरल सत्य लोकांना सांगते.