Created By: BoomTranslated By: ऑनलाईन लोकमत
Rachin Ravindra iPhone News, Fact Check: ८ फेब्रुवारी २०२५ रोजी पाकिस्तानमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा क्रिकेटपटू रचिन रवींद्र जखमी झाला. सोशल मीडियावरील वापरकर्ते असा दावा करत आहेत की जखमी झाल्यानंतर रचिनला लाहोरमधील ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथून त्याचा आयफोन चोरीला गेला होता. बूमला हा दावा खोटा असल्याचे आढळले. न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मीडिया मॅनेजर विली निकोल्स यांनी बूमला सांगितले, की रचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही आणि त्याचा फोन चोरीला गेल्याचे वृत्त खोटे आहे.
कुणी केला दावा?
फेसबुकवरील एका वापरकर्त्याने रवींद्र रचिनचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'रचिन रविंद्रचा आयफोन लाहोरच्या रुग्णालयातून चोरीला गेला होता, जिथे त्याला जखमी झाल्यानंतर दाखल करण्यात आले होते. [पीकेटी न्यूज].
हाच दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रेड्स वरही व्हायरल होत आहे.
तथ्य पडताळणी
या दाव्याची पडताळणी करण्यासाठी बूमने प्रथम मीडिया रिपोर्ट्स तपासले. पण आम्हाला दाव्याची पुष्टी करणारी कोणतीही विश्वासार्ह बातमी सापडली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दाव्यात 'पीकेटी न्यूज' नावाच्या एका मीडिया आउटलेटचा उल्लेख आहे. आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला आढळले की पाकिस्तानमध्ये या नावाचे कोणतेही अधिकृत माध्यम नाही. या नावाच्या आसपास जाणारी नावे असलेली 'न्यूज पाकिस्तान टीव्ही' आणि 'पाकिस्तान टुडे' अशी नावे आहेत, जी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या कव्हर करतात. भारतात 'पीटीसी न्यूज' नावाचा एक प्रमुख पंजाबी वृत्तवाहिनी देखील आहे.
आम्ही अधिक तपास केला तेव्हा आम्हाला आढळले की हा खोटा दावा पहिल्यांदा १७ फेब्रुवारी २०२५ रोजी mufaddla parody नावाच्या एका खात्यावरून करण्यात आला होता.
हे विडंबनात्मक अकाउंट प्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक मुफद्दल वोहरा यांच्या नावाने तयार केलेले बनावट अकाउंट आहे. या अकाउंटने त्यांच्या बायोमध्ये देखील याचा उल्लेख केला आहे.
विडंबनात्मक खाती म्हणजे विनोद, व्यंग्य किंवा मनोरंजनाच्या उद्देशाने प्रसिद्ध व्यक्ती, ब्रँड किंवा संस्थेच्या नावाने तयार केलेली बनावट खाती असतात. मुफद्दल वोहरा यांच्या नावाने बनावट अकाउंटवरून केलेल्या आणखी एका दाव्याची बूमने यापूर्वी फॅक्ट चेक केलं होतं.
NZC च्या मीडिया मॅनेजरनेही फेटाळला दावा
अधिक स्पष्टीकरणासाठी आम्ही न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मीडिया मॅनेजर विली निकोल्स यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनी म्हटले की हा दावा खोटा आहे. "रचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते असे विली निकोल्सने बूमला सांगितले. तसेच त्याचा फोन चोरीला गेल्याची बातमीही चुकीची आहे असेही स्पष्ट केले.
निष्कर्ष
जखमी झाल्यानंतर रचिन रविंद्रला लाहोरमधील ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथून त्याचा आयफोन चोरीला गेल्याचा दावा खोटा आहे.
(सदर फॅक्ट चेक Boom या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)