Created By: Vishvas NewsTranslated By: ऑनलाईन लोकमत
सोशल मीडियावर एक कोलाज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मुलाने पाकिस्तानमध्ये आपल्या आईशी लग्न केल्याचा दावा केला जात आहे. अनेक युजर्स हा दावा खरा मानून कोलाज शेअर करत आहेत.
विश्वास न्यूजने केलेल्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचं आढळून आलं. खरा फोटो पाकिस्तानच्या अब्दुल अहदने त्याच्या आईचे दुसरं लग्न लावलं तेव्हाचा आहे. आता हाच फोटो सोशल मीडिया युजर्सकडून शेअर केला जात आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय आहे?
३१ डिसेंबर २०२४ रोजी व्हायरल कोलाज (अर्काइव्ह लिंक) शेअर करताना सोशल मीडिया युजर रामदास काँग्रेसी यांनी लिहिलं की, #पाकिस्तानमध्ये एका मुलाने त्याच्या आईशी लग्न केलं, जिने तिला १८ वर्षे वाढवलं. ही बातमी जगभर व्हायरल झाली आहे का?? तुमचं मत? पाकिस्तानी मीडियाने त्याचं वर्णन "हृदयस्पर्शी हावभाव" म्हणून केलं असताना, अब्दुल अहदने सोशल मीडियावर आपली कथा शेअर केली. अब्दुलने सांगितले की त्याची आई त्याच्यासोबत १८ वर्षे कशी जगली आणि आता त्याला तिच्या आईने तिचं आयुष्य जगावं अशी त्याची इच्छा आहे. पाकिस्तानातील सुन्नी मुस्लिमांनी इस्लामला बळकटी दिली आहे, आता इथल्या लोकांची वेळ आहे...
तपास
व्हायरल दाव्याचे सत्य शोधण्यासाठी आम्ही गुगल लेन्सचा वापर केला. आम्हाला अनेक न्यूज वेबसाईटवर फोटोशी संबंधित बातम्या मिळाल्या. bollywoodshaadis.com या वेबसाईटवर फोटोशी संबंधित बातमी सापडली. ३० डिसेंबर २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या बातमीत म्हटलं आहे की, पाकिस्तानच्या अब्दुल अहदने त्याच्या आईचं दुसरं लग्न लावून सर्वांना आश्चर्यचकित केलं. पाकिस्तानची ही गोष्ट अनेकांच्या हृदयाला भिडली आहे. अब्दुल अहदने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नाची क्लिपही शेअर केली आहे.
सर्च दरम्यान, आम्हाला thedailyguardian.com या वेबसाइटवर फोटोशी संबंधित बातम्या देखील मिळाल्या. ३० डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत असं सांगण्यात आलं होतं की, पाकिस्तानमध्ये अब्दुल अहदने त्याच्या आईचं दुसरं लग्न केलं, त्यामुळे सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत.
आम्हाला BOL न्यूजच्या अधिकृत YouTube चॅनेलवर एक व्हिडीओ रिपोर्ट सापडला. ३० डिसेंबर २०२४ रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, लाहोरच्या अब्दुल अहदने त्याच्या आईचं दुसरं लग्न लावलं आणि लग्नाचा व्हिडीओ आणि फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. ज्याचं सर्वजण कौतुक करत आहेत.
अब्दुल अहदने १८ डिसेंबर २०२४ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर व्हिडीओ शेअर केला होता. अब्दुलने या पोस्टमध्ये त्याच्या आईच्या लग्नाचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे.
व्हायरल पोस्टशी संबंधित इतर बातम्या येथे पाहता येतील.
आम्ही पाकिस्तानी पत्रकार आदिल अलीशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की व्हायरल दावा खोटा आहे. मुलाने आईशी लग्न केलं नाही, तर मुलाने आईचं दुसरं लग्न लावलं आहे. ज्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
शेवटी, आम्ही पोस्ट शेअर केलेल्या Facebook युजर्सचं प्रोफाइल स्कॅन केलं. फेसबुकवर युजरचे ५६३ फ्रेंड्स असल्याचं आढळून आलं. युजरने स्वत:ला भोपाळचा रहिवासी असल्याचं सांगितलं आहे.
निष्कर्ष
मुलाने पाकिस्तानमध्ये आईशी लग्न केल्याच्या दाव्यासह एक कोलाज शेअर केला जात आहे. विश्वास न्यूजने तपास केला असता हा दावा खोटा असल्याचं आढळून आलं. वास्तविक, हा फोटो त्यावेळचा आहे जेव्हा अब्दुल अहदने त्याच्या आईचं दुसरं लग्न लावलं होतं. अब्दुल अहदने आपल्या आईशी लग्न केल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.
(सदर फॅक्ट चेक Vishvas News या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)