नवी दिल्ली - रेल्वेच्या वेटिंग तिकीटाबाबत सोशल मीडियात एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. भारतीय रेल्वेने वेटिंग तिकीट नियमांत बदल केले आहेत. आता वेटिंग तिकिट असणारे प्रवासी ट्रेनमधून प्रवास करू शकतात असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. परंतु काही यूजरने हा नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे असाही दावा केला आहे.
या पोस्टबाबत पडताळणी केली असता वेटिंग तिकिटावर रेल्वेच्या आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास दंड आकारला जाऊ शकतो हे समोर आले आहे. ऑनलाईन बुक केलेली तिकीट जर कन्फर्म झाली नाही तर ती ऑटोमॅटिक रद्द होते आणि तिकिटासाठी भरलेले पैसेही खात्यात पुन्हा जमा होतात. पोस्टमधील दाव्यानुसार १ जानेवारी २०२५ पासून लागू होणाऱ्या नियमाबाबत रेल्वेकडून अधिकृतपणे कुठलेही नोटिफिकेशन काढण्यात आले नाही किंवा त्या आशयाची बातमीही नाही.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये दावा?
एका यूजरने विश्वास न्यूजच्या हेल्पलाईनवर ही पोस्ट पाठवून त्याची सत्यता पडताळणी करण्याची विनंती केली. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, रेल्वेच्या वेटिंग तिकिटावर ट्रेनमधून प्रवास करू शकता हा नवीन नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे. त्यामुळे आता वेटिंग तिकीटवाले प्रवासीही कुठल्याही अडथळ्याविना ट्रेनमधून प्रवास करू शकतात.
फेसबुक युजर News Beacon यांनीही त्याबाबतचे दावे शेअर (अर्काइव्ह लिंक) केले होते. त्यात लिहिलं होतं की,..
"Waiting Ticket New Rule- आता विना अडथळा करू शकणार प्रवास, रेल्वेच्या नवीन नियमानुसार वेटिंग तिकिटधारकांसाठी एक मोठी अपडेट भारतीय रेल्वेने जारी केली आहे. त्यात आता वेटिंग तिकिटवालेही विना कुठल्याही त्रासाशिवाय त्यांचा प्रवास ट्रेनमधून करू शकतात"
पडताळणीत काय आढळलं?
व्हायरल दाव्याची पडताळणीसाठी जेव्हा गुगलमध्ये किवर्ड सर्च केले तेव्हा आयआरसीटीसी वेबसाईटवर माहिती मिळाली. त्यानुसार, चार्ट तयार झाल्यानंतर ज्या प्रवाशांची सीट कन्फर्म किंवा आरएएसी असेल त्यांचे नाव यादीत दिसेल आणि ते प्रवासी ट्रेनमधून प्रवास करू शकतात. ज्यांची नावे अंशतः पुष्टी झाली आहेत/अंशत: प्रतिक्षा यादीत आहेत किंवा अंशतः RAC आहेत ते प्रतिक्षा यादीतील प्रवाशांसह चार्टमध्ये दिसतील. ज्यांची नावे चार्टमध्ये नाहीत त्यांना ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी नाही. जर ते ट्रेनमधून प्रवास करताना आढळले तर रेल्वेच्या सध्याच्या नियमानुसार त्यांना विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी म्हणून मानले जाईल. त्यांच्याकडून दंड आकारण्यात येईल. ज्या प्रवासांची तिकिटे वेटिंगवर असतील त्यांना रेल्वे त्यांच्या प्रवासासाठी भरलेले पैसे पुन्हा रिफंड करते.
आरसीटीसी कॅन्सलेशन नियमानुसार, जर पहिल्या यादीनंतर जर वेटिंग तिकीट असणाऱ्या प्रवाशांची जागा कन्फर्म नसेल तर त्यांची तिकीटे रद्द केली जातात आणि तिकिटासाठी भरलेले पैसे परत करण्यात येतात.
PIB च्या फॅक्ट चेक युनिटने १८ जुलै २०२४ रोजी एका पोस्टमध्ये माहिती दिली होती की, रेल्वेच्या २०१० च्या परिपत्रकानुसार केवळ कन्फर्म आणि अंशतः कन्फर्म केलेले तिकीट असलेले प्रवासी रिझर्व्ह कोचमध्ये प्रवास करू शकतात. प्रतिक्षा तिकीट आपोआप रद्द होते. जर एखाद्या प्रवाशाने काउंटरवरून वेटिंग तिकीट घेतले तर तो फक्त जनरल डब्यातूनच प्रवास करू शकतो. रिझर्व्ह कोचमध्ये नाही. या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
१६ जुलै २०२४ रोजी India.com वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, भारतीय रेल्वेने प्रतिक्षा यादीतील प्रवाशांसाठी कठोर नियम लागू केले आहेत. या अंतर्गत वेटिंग तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास प्रवाशाकडून दंड वसूल केला जाईल आणि त्याला पुढील स्थानकावर उतरवलं जाईल. अशा प्रवाशाने एसी कोचमधून प्रवास केल्यास त्याला किमान ४४० रुपये दंड आणि पुढील स्थानकापर्यंतचे भाडे भरावे लागेल. स्लीपर कोचमध्ये वेटिंग तिकिटावर प्रवास केल्यास २५० रुपये दंड आणि पुढील स्टेशनपर्यंतचे भाडे भरावे लागणार आहे.
२९ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यसभेत रेल्वेच्या वेटिंग तिकिटांबाबत विचारले असता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, नियमानुसार प्रतिक्षा यादीतील प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करू शकत नाहीत.
पडताळणीत असा कुठलाही रिपोर्ट अथवा रेल्वे नोटिफिकेशन मिळालं नाही ज्यात व्हायरल पोस्टमध्ये दावा करणारा नियम १ जानेवारी २०२५ पासू लागू करण्याबाबत कुठलीही घोषणा झाली आहे.
याबाबत नॉर्थ वेस्टर्न रेल्वेचे सीनिअर पीआरओ कमल जोशी म्हणाले की, वेटिंग तिकीट कन्फर्म नसेल तर प्रवासी प्रवास करू शकत नाही. जर त्याने असे केले तर त्याला दंड आकारला जाऊ शकतो. १ जानेवारी २०२५ पासून नियमात बदलाबाबत अद्याप कुठलीही सूचना प्राप्त झाली नाही.
वेटिंग तिकीटबाबत चुकीचा दावा करणाऱ्या फेसबुक यूजरचा प्रोफाईल पाहिला तर त्याला केवळ १६ फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष
ट्रेनमध्ये प्रवास करताना जर तिकीट कन्फर्म नसेल तर आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास मनाई आहे. वेटिंग तिकिटावर प्रवास केल्यावर दंड आकारला जाऊ शकतो.
(सदर फॅक्ट चेक 'विश्वास न्यूज' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)