Created By: Vishvas NewsTranslated By: ऑनलाइन लोकमत
Fact Check: रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असून चार वर्षांच्या कालावधीनंतर ते आता व्हाईट हाऊसमध्ये परतणार आहेत. विजयानंतर त्यांनी आपल्या विजयी भाषणात सर्व समर्थकांचे आणि टीमचे आभार मानले. यादरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की ट्रम्प यांच्या विजयी भाषणादरम्यान सभागृहात मोदी-मोदी अशी घोषणाबाजी करण्यात आली. विश्वास न्यूजने या प्रकरणाचा तपास केला असून हा दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. जमावाने ‘मोदी मोदी’ नव्हे तर 'बॉबी-बॉबी'चा नारा लावला असेही स्पष्ट झाले आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय आहे?
६ नोव्हेंबर २०२४ रोजी, 'द लीजेंड लामा' ( अर्काइव्ह लिंक ) नावाच्या फेसबुक वापरकर्त्याने व्हायरल पोस्ट शेअर केली, ज्यावर 'डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या भाषणात जनतेने 'मोदी-मोदी'चा जल्लोष केला' ( Crowd Chants ‘Modi Modi’ during Victory Speech By Donald John Trump ), असे लिहिले होते. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ट्रम्प यांच्या देशात मोदींचा बोलबाला आहे.
तथ्य पडताळणी
व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचे संपूर्ण भाषण ऐकले. एबीसी न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर त्यांचे पूर्ण भाषण मिळाले. या भाषणात १९ मिनिटे ३६ सेकंद या वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी रॉबर्ट एफ. केनेडी ज्यूनियर यांचे नाव घेतले. केनेडी ज्यूनियर अमेरिकेला पुन्हा निरोगी बनविण्यात मदत करतील. तो एक महान व्यक्तिमत्व आहे. त्यांना अनेक गोष्टी करायच्या आहेत. पण बॉबी, तू खनिजतेलाची जबाबदारी माझ्यावर सोड, असे ट्रम्प म्हणतात. इतक्यात उपस्थित लोक बॉबी-बॉबीच्या घोषणा देऊ लागतात.
या संपूर्ण भाषणाचे व्हिडीओ वृत्तांकनही मिळाले. त्यात असे लिहिले होते की रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियरच्या उल्लेखावर, जनतेने बॉबी-बॉबीच्या घोषणा दिल्या.
यानंतर आम्ही दैनिक जागरणमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचे कव्हरेज करणारे ज्येष्ठ पत्रकार जेपी रंजन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पुष्टी केली की घोषणा रॉबर्ट एफ. केनेडी ज्यूनियर, प्रेमाने बॉबी म्हणून ओळखले जाते.
कोण आहे रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर?
रॉबर्ट एफ. केनेडी ज्यूनियर हे अमेरिकन राजकीय नेते आणि पर्यावरण रक्षणाचे कार्यकर्ते आहेत. ते प्रसिद्ध केनेडी कुटुंबातील आहेत. ते रॉबर्ट एफ. केनेडी (जे १९६८ मध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार होते) आणि अमेरिकेचे ३५वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचा पुतण्या आहे. त्यांनी २०२४ची यूएस अध्यक्षपदाची निवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नंतर त्यांनी आपला विचार बदलला आणि डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
खोटे दावे करून व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या द लीजेंड लामा या यूजरला १३ हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: ट्रम्प यांच्या भाषणावेळी मोदी-मोदी अशा घोषणा करण्यात आल्या हा दावा खोटा असल्याचे तथ्य पडताळणीत निष्पन्न झाले.
(सदर फॅक्ट चेक Vishvas News या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)