Created By: Fact CrescendoTranslated By: ऑनलाइन लोकमत
Fact Check: काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानला ५० वर्षांसाठी बिनव्याजी ५ हजार कोटींचे कर्ज देण्यात येईल अशी घोषणा राहुल गांधींनी घोषणा केल्याचा दावा करणारे एबीपी न्यूजच्या बातमीचे ग्राफिक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मात्र याची पडताळणी केली असता कळाले की, व्हायरल होत असलेले ग्राफिक फेक असून अशी कोणतीही बातमी एबीपी न्यूजने दिलेली नाही.
व्हायरल पोस्टमध्ये एबीपी न्यूजचा लोगो आणि ग्राफिक्स दिसत आहे. या पोस्टमध्ये असलेल्या बातमीमध्ये राहुल गांधी यांच्या नावासोबत दोन घोषणा लिहिलेल्या दिसत आहेत. पहिली घोषणा ही पाकिस्तानला मदत करणे आवश्यक आहे आणि आम्ही ते नक्कीच करू, अशी आहे. तर दुसरी घोषणा ही आमचे सरकार बनताच आम्ही पाकिस्तानला ५० वर्षांसाठी ५ हजार कोटींचे कर्ज बिनव्याजी देऊ.
सोशल मीडियावर हे ग्राफिक्स शेअर करताना युजर्सनी कॅप्शनमध्ये म्हटलं की, “काँग्रेसचे सरकार आले तर पाकिस्तानला ५ हजार करोड रुपये बिनव्याजी ५० वर्षांसाठी देणार – राहुल गांधी.”
अर्काइव्ह पोस्ट -फेसबुक
फॅक्ट चेक
एबीपी न्यूजच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे ग्राफिक आढळले नाही.
याउलट एबीपी न्यूजने १२ नोव्हेंबर २०१८ रोजी ट्विटद्वारे स्पष्ट केले होते की, व्हायरल होत असलेली ग्राफिक्स बनावट असून अशी बातमी एबीपी न्यूज कडून देण्यात आलेली नाही.
ही पोस्ट शेअर करताना एबीपी न्यूजने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “याद्वारे कळवण्यात येत आहे की, ऑनलाईन व्हायरल केली जाणारी पोस्ट आमच्या चॅनेलच्या टेम्पलेटशी छेडछाड करुन तयार करण्यात आली आहे. राहुल गांधींच्या विधानांचे वृत्त एबीपीने जाहीर केलेले नाही. हे वृत एबीपी न्यूज नेटवर्कशी संबंधित नाही.”
निष्कर्श
यावरून असं सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले ग्राफिक फेक आहे. एबीपी न्यूजने २०१८ मध्येच स्पष्ट केले की, "काँग्रस सत्तेत आल्यावर राहुल गांधी पाकिस्तानला बिनव्याजी ५० वर्षांसाठी ५ हजार कोटींचे कर्ज देतील अशी कोणतीही बातमी एबीपी न्यूजने दिलेली नाही. खोट्या दाव्यासह बनावट ग्राफिक अनेक वर्षांपासून व्हायरल होते आहे."
(सदर फॅक्ट चेक Fact Crescendo या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)