Created By: आजतकTranslated By: ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या रॅलीमध्ये चीनचं संविधान हातात घेत फिरत असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियात राहुल गांधींचा फोटो आणि हातात संविधान असलेला फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मोठ्या प्रमाणात हे शेअरही होत आहे.
या मेसेजमध्ये दावा केला जातोय की, राहुल गांधी त्यांच्या रॅलीमध्ये चीनचं संविधान घेऊन फिरत आहेत. या दाव्यासोबत एक फोटो जोडला आहे त्यात राहुल गांधींच्या हातात लाल पुस्तक आहे. हेच लाल पुस्तक चीनचं संविधान असल्याचं बोललं जातंय.
एका फेसबुक युजरनं हा फोटो शेअर करत म्हटलंय की, राहुल गांधी चीनचं संविधान घेऊन फिरतायेत का? भारताच्या संविधानाचं कव्हर निळ्या रंगाचे आहे. चीनच्या संविधानाचे कव्हर लाल रंगाचे आहे. राहुल गांधी यांच्या हातात चीनचं संविधान आहे. ही पोस्ट (अर्काइव्ह पोस्ट) याठिकाणी पाहू शकता.
आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हेमंत बिस्वा सरमा यांनीही हा दावा केला होता. १७ मे रोजी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी राहुल यांच्या हातात लाल पुस्तक असलेला फोटो शेअर केला आणि लिहिलं की, राहुल गांधी चीनचं संविधान घेऊन फिरतायेत का? ही अर्काइव्ह पोस्ट इथं पाहू शकता.
पडताळणीत काय आढळलं?
आजतकच्या फॅक्ट चेकमध्ये या व्हायरल दाव्याची पडताळणी केली तेव्हा राहुल गांधी त्यांच्या रॅलीत चीनचं नाही तर भारतीय संविधान दाखवत असल्याचं आढळलं. लाल कव्हर असलेले हे संविधान एक पॉकेट इडिशन आहे ज्याला ईस्टर्न बुक कंपनीनं प्रकाशित केला.
सत्यता कशी तपासली?
राहुल गांधी यांचा व्हायरल फोटो रिवर्स सर्चद्वारे तपासला तेव्हा बिझनेस स्टँडर्डची एक बातमी समोर आली. ज्यात या फोटोचा वापर केला होता. या बातमीत म्हटलंय की, हा फोटो ५ मे रोजी तेलंगणाच्या गडवाल येथील जाहीर सभेतील आहे.
या माहितीच्या आधारे आणखी सर्च केले असता, राहुल गांधीच्या गडवाल सभेतील टीव्ही ९ तेलुगु या युट्यूब चॅनेलचा व्हिडिओ सापडला. या व्हिडिओ १.०२.०९ सेकंदाला राहुल गांधी एक लाल पुस्तक हातात घेताना दिसतात. आपण जर निरखून पाहिले तर त्यावर इंग्रजी भाषेत भारतीय संविधान असं लिहिलं होते. खालील फोटोत तु्म्ही राहुल गांधी यांच्या हातातील भारतीय संविधान पाहू शकता.
संविधान दाखवताना राहुल गांधी जनतेला सांगतात की, तुम्हाला जो अधिकार मिळाला आहे तो याच संविधानाच्या आधारे मिळाला आहे. भाजपा हेच संविधान संपवू इच्छिते असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे राहुल गांधी यांनी भाषणामध्ये जे लाल पुस्तक दाखवले ते चीनचं नसून भारताचं असल्याचं स्पष्ट होते.
राहुल गांधी एकाहून अधिक भाषणात हेच लाल रंगाचं कव्हर असलेले संविधान दाखवतात. ६ मे रोजी मध्य प्रदेशातील अलीराजपूरमध्येही राहुल गांधी यांनी हे संविधान दाखवले होते. १८ मे रोजी दिल्लीच्या चांदणी चौक लोकसभा मतदारसंघात अशोक विहारमध्ये एक सभा झाला तिथेही राहुल गांधींनी हे संविधान दाखवलं होते.
काय आहे हे लाल रंगाचं संविधान?
किवर्ड सर्चच्या मदतीनं शोध घेतला असता लाल कव्हर असलेले भारतीय संविधान कॉट पॉकेट एडिशन आहे. जे ईस्टर्न बुक कंपनीनं प्रकाशित केले आहे. आम्हाला हे संविधान ईबीसीच्या वेबस्टोरच्या वेबसाईटवर मिळालं. जे ऑनलाईन खरेदी केले जाऊ शकते.
२६ जुलै २०१७ रोजी द स्टेट्समॅनचं एक रिपोर्ट समोर आला. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा लाल कव्हर असलेल्या संविधानासोबत फोटो आहे. त्यासोबत गृहमंत्री अमित शाह यांनाही हेच कोट पॉकेट एडिशनवालं संविधान भेट दिले गेले आहे.
निष्कर्ष - सोशल मीडियावरील व्हायरल दाव्याची सत्यता पडताळली असता राहुल गांधी चीनचं संविधान घेऊन फिरतायेत हा दावा खोटा आहे. खऱ्याअर्थाने त्यांच्या हातात भारतीय संविधानाचं कोट पॉकेट एडिशन आहे जे त्यांनी अनेक रॅलीत दाखवलं आहे.
(सदर फॅक्ट चेक आजतक या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)