Created By: factlyTranslated By: ऑनलाईन लोकमतरतन टाटांचे स्वप्न असलेली टाटा नॅनो ही कार जरी बंद झालेली असली तरी ती पुन्हा नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखाली लाँच केली जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. या कारशी संबंधीत फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले जात होते. यामध्ये पेट्रोल इंजिन आणि शहरात चालविण्यासाठी नवे डिझाईन व ३० किमीचे मायलेज देत असल्याचे दावेही केले जात होते. हे दावे इथे केले जात होते.या पोस्टमध्ये केलेल्या दाव्यांची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगल सर्चवरून शोध घेतला परंतु अशी कोणतीही घोषणा आढळली नाही. टाटा मोटर्सने असे विधान केले असते तर त्याची व्यापक चर्चा झाली असती. तथापि, TATA Motors च्या सोशल मीडियावर किंवा कोणत्याही विश्वासार्ह न्यूज प्लॅटफॉर्मवर याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
फोटोद्वारे गुगल लेन्सचा वापर करून शोध घेतला असता तिथे आम्हाला यूट्यूब चॅनल ह्यू बोगन मोटर्सवरील एक व्हिडीओ दिसला. हा व्हिडीओ 15 ऑगस्ट 2023 रोजीचा आहे. ही कार टाटाची नॅनो ही नसून तिच्याशी साधर्म्य असलेली टोयोटा आयगो एक्स पल्स ही आहे.
व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये टोयोटाचा लोगो बदलण्यात आलेला आहे. तसेच नंबर प्लेटवरील नावही बदलण्यात आले आहे.
खालील तुलना TATA Motors आणि Toyota Motors च्या कारवरील लोगोमधील फरक दर्शवते.
निष्कर्ष : TATA मोटर्सने आधुनिक वैशिष्ट्यांसह नवीन नॅनो कार लॉन्च करण्याची कोणतीही घोषणा केलेली नाही, व्हायरल फोटो हे एडिट करण्यात आलेले आहेत. (सदर फॅक्ट चेक Factly या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)