Created By: आज तक फॅक्ट चेकTranslated By : ऑनलाइन लोकमत
देशात १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 102 जागांवर 64 टक्के मतदान झाले. या दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, व्हिडिओमध्ये काही लोक VVPAT सारख्या मशीनमधून स्लिप काढताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून लोक म्हणत आहेत की हा प्रकार 19 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतरचा आहे आणि भाजपवर VVPAT मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोपही करत आहेत.
व्हिडिओ शेअर करताना एका ट्विटर युजरने लिहिले की, जिथे पूर्ण सुरक्षा ठेवण्यात आली होती अशा ठिकाणी 19 तारखेला झालेल्या निवडणुकांनंतर, तेथून VVPAT स्लिप्स चोरल्या जात आहेत आणि भाजपा त्यात स्वत:च्या स्लिप्स उघडपणे जमा करत आहे. ही लोकशाहीची उघडपणे करण्यात येत असलेली हत्या आहे. याबाबत निवडणूक आयोगाचे काय म्हणणे आहे?"
या पोस्ट ची अर्काईव्ह लिंक येथे पाहा.
आज तक फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले की हा व्हिडिओ नवीन नाही किंवा व्हिडिओत दावा केल्याप्रमाणे VVPAT मशिन्समध्ये कोणतीही छेडछाड केलेली नाही.
सत्य पडताळणी
व्हायरल व्हिडिओचे कीफ्रेम शोधून रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने हा व्हिडिओ अनेक ट्विटर युजर्सने डिसेंबर 2022 मध्ये शेअर केल्याचे आढळून आले. या पोस्टमध्ये तो व्हिडीओ गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळचा असल्याचा दावा केला जात होता आणि निवडणुकीत भाजपच्या विजयावर टीका केली जात होती. ट्विटवर दाव्यानुसार, हा व्हिडिओ गुजरातच्या भावनगरमधील आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की या व्हिडिओचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही.
या व्हायरल पोस्टवर भावनगरचे जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी यांचेही उत्तर मिळाले, ज्यात त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल सांगितले की, भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर, VVPAT स्लिप्स काढल्या जातात आणि एका काळ्या लिफाफ्यात टाकून सीलबंद केल्या जातात. जेणेकरून भविष्यातील निवडणुकांमध्ये VVPATचा वापर करता येईल. संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात येते. त्याची एक प्रत स्ट्राँग रूममध्ये आणि एक संबंधित डीईओकडे ठेवली जाते.
व्हिडिओबद्दल अधिक माहितीसाठी, भावनगरचे जिल्हा दंडाधिकारी आर. के. मेहता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आज तकला सांगितले की व्हायरल व्हिडिओ जुना आहे आणि व्हिडिओवर सामान्य प्रक्रियेनुसार प्रक्रिया केली जात आहे. ते म्हणाले की, मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आणि निकाल घोषित झाल्यानंतर, व्हीव्हीपीएटी मशीनमधून स्लिप्स काढल्या जातात, एका कव्हरमध्ये ठेवल्या जातात आणि ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही आणि ही एक सामान्य प्रक्रिया आहे असेही ते म्हणाले.
निष्कर्ष- व्हायरल झालेला व्हिडिओ दोन वर्षे जुन्या निवडणूक आयोगाच्या नित्याच्या प्रक्रियेचा आहे. भाजपाने VVPAT मशिनशी छेडछाड केल्याचा हा खोटा दावा आहे.
(सदर फॅक्ट चेक 'आज तक फॅक्ट चेक' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.)