काश्मिरी पंडितांच्या व्यथा-वेदना मांडणारा 'द कश्मीर फाईल्स' हा सिनेमा देशभरात सर्वच अर्थाने गाजला. बॉक्स ऑफिसवर त्याने दणक्यात कमाई केलीच, पण राजकारणातही त्यावरून बराच 'राडा' झाला, समाजकारणातही त्याचे तीव्र पडसाद उमटले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच हा चित्रपट पाहण्याचं केलेलं आवाहन, भाजपाशासित राज्यांमध्ये तो 'टॅक्स फ्री' केला जाणं, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यावरून मारलेले टोले, सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी उठलेल्या प्रतिक्रियांनी वातावरण चांगलंच तापलं. काश्मिरी पंडितांसाठी सिनेमाचे निर्माते काय करणार, असा प्रश्नही विचारला गेला. या पार्श्वभूमीवर, 'द कश्मीर फाईल्स'च्या निर्मात्यांनी सिनेमाची २०० कोटींची कमाई पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीला दान केल्याची एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. मात्र, 'लोकमत'ने केलेल्या पडताळणीमध्ये, हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.
काय आहे दावा?
'द कश्मीर फाईल्स'च्या निर्माता-दिग्दर्शकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक फोटो व्हायरल पोस्टमध्ये दिसतो आणि त्यावर "THE KASHMIR FILES 200 करोड का सारा फंड प्रधानमंत्री कोष में दान किया" असा मेसेज आहे. केशव अरोरा यांनी या फोटोसोबत तशाच आशयाचा मेसेजही लिहिला आहे आणि विवेक अग्निहोत्री यांना हे 'दान' केल्याबद्दल सॅल्यूट केला आहे. परंतु, त्यांचा दावा तथ्यहीन आहे.
कशी केली पडताळणी?
हा दावा पडताळून पाहण्यासाठी सगळ्यात आधी 'लोकमत'ने गुगलवर की-वर्ड सर्च केले. मात्र, द कश्मीर फाईल्सच्या निर्मात्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमध्ये योगदान दिल्याबाबतची कुठलीही बातमी कोणत्याही अधिकृत वेब-पोर्टलवर नव्हती. जेव्हा आम्ही Google Images पाहिल्या तेव्हा, दाव्यासोबत वापरली गेलेली इमेज आम्हाला सापडली. 'द कश्मीर फाईल्स'चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ती १२ मार्च रोजी शेअर केली होती आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ती रिट्विटही केली होती.
या ट्विटमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आनंद झाला, त्यांनी कामाचं कौतुक केलं, अशा भावना अभिषेक अग्रवाल यांनी व्यक्त केल्यात. कुठल्याही मदतीचा, दानाचा वगैरे त्यात उल्लेख नाही. मुळात, सिनेमा ११ मार्च रोजी प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ही भेट झाली होती.
पुढे सिनेमाने दणदणीत कमाई केल्यानंतर, निर्मात्यांनी अशा प्रकारचा मदतीचा काही निर्णय घेतला असता, तर नक्कीच त्यासंदर्भात मीडिया आणि सोशल मीडियावरून माहिती दिली असती. मात्र, तसं काहीही सापडलं नाही. तसंच, पंतप्रधान कार्यालयानेही अशा मदतीबाबतचं कुठलंही ट्विट केलेलं नाही.
उलट, विवेक अग्निहोत्री यांनी IAS अधिकारी नियाझ खान यांच्या ट्विटला दिलेला रिप्लाय बराच सूचक आहे. काश्मिरी पंडितांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांची घरं बांधण्यासाठी द कश्मीर फाईल्सच्या निर्मात्यांनी सगळी रक्कम ट्रान्सफर करावी, असं मत नियाझ खान यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर, तुमच्या पुस्तकांच्या रॉयल्टीचाही कसा विनियोग करता येईल, याबाबत भेटून चर्चा करू, अशी टिप्पणी अग्निहोत्री यांनी केली.
त्याशिवाय, विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी सिद्धार्थ कानन यांना दिलेल्या मुलाखतीत या संदर्भात केलेलं विधानही बोलकं आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्ही काश्मिरी पंडितांसाठी काम करत आहोत आणि सामाजिक जाणिवेतून हे काम करत असल्यानं त्याचा गाजावाजा करणं मला आवडत नाही, असं विवेक अग्निहोत्री यांनी नमूद केलंय. पल्लवी जोशी यांनी तर, तुम्ही किती कोटी दान करणार, हा प्रश्नच ओंगळवाणा असल्याची चपराक लगावली आहे. कुठलाही निर्माता सिनेमातून जे पैसे कमावतो, ते पुढच्या प्रोजेक्टसाठी ठेवतो, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय.
दरम्यान, या संदर्भात अधिक माहितीसाठी आम्ही थेट विवेक अग्निहोत्री यांच्या टीमशीच संपर्क साधला. मात्र, त्यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला.
निष्कर्ष
'द कश्मीर फाईल्स' सिनेमाच्या निर्मात्यांनी २०० कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीला दिल्याचा दावा निराधार आहे.