Created By: आजतकTranslated By: ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोठमोठे नेते हेलिकॉप्टरचा वापर करून अनेक रॅली करताना दिसतात. अशातच हेलिकॉप्टरला लटकलेल्या एका व्यक्तिचा हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका रॅलीतील असल्याचा दावा काही युजर करतायेत. मोदींच्या हेलिकॉप्टरला पकडून हा व्यक्ती हवेत लटकतोय असं व्हिडिओ शेअर करत म्हटलं जात आहे.
हा व्हिडिओ एका खुल्या मैदानावर लोकांच्या गर्दीत असलेल्या हेलिकॉप्टरचा दिसतो. जसं हेलिकॉप्टर हवेत उड्डाण घेते तेव्हा काही जण त्याला लटकण्याचा प्रयत्न करतात. हेलिकॉप्टर उडते तेव्हा काही लोक खाली पडतानाही दिसतात. परंतु एक व्यक्ती घट्ट पकडून हेलिकॉप्टरसह बऱ्याच उंचीवर लटकताना दिसून येतो.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत एकानं म्हटलंय की, जेव्हा मोदी एका रॅलीत सभा करण्यासाठी पोहचले तेव्हा एका अंधभक्त स्वत:ला रोखू शकला नाही. हा व्हिडिओ भारताचा असल्याचं सांगत शेअर केला जात आहे. याची (अर्काइव्ह लिंक) इथं पाहू शकता.
आजतकनं याचं फॅक्ट चेक केले असता हा व्हिडिओ भारतातला नसून केनियातील २०१६ मध्ये घडलेल्या घटनेचा असल्याचं पुढे आले.
कशी केली पडताळणी?
व्हिडिओच्या किफ्रेम्सला रिवर्स सर्चद्वारे शोधले असता २०१६ चा एक रिपोर्ट समोर आला. त्यानुसार ही घटना केनियातील आहे. जिथं Saleh Wanjala नावाचा व्यक्ती एका हेलिकॉप्टरला पकडून हवेत लटकताना दिसतो. केनियातील बंगोमा प्रांतातील एका शोक सभेवेळी घडलेली घटना आहे. रिपोर्टमध्ये या घटनेचा दुसऱ्या अँगलने बनवलेला व्हिडिओही खाली तुम्ही पाहू शकता.
या माहितीच्या आधारे या घटनेशी निगडीत आणखी काही रिपोर्ट सापडले. १३ मे २०१६ रोजी Jacob Juma नावाच्या केनियन व्यावसायिकासाठी बंगोमा इथं सार्वजनिक शोक सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी हे हेलिकॉप्टर त्यांचा मृतदेह मैदानात घेऊन आला होतं. त्यावेळी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाली होती.
शोकसभेनंतर जेव्हा हेलिकॉप्टरनं मैदानातून उड्डाण घेतले तेव्हा एक व्यक्ती हेलिकॉप्टरच्या लँडिंग स्किडला लटकला. लोकांच्या गोंधळात या हेलिकॉप्टरनं जमिनीपासून काही अंतरावर या व्यक्तीला उतरवण्याचा प्रयत्नही केला. परंतु जवळपास २ किमी पर्यंत हा व्यक्ती हेलिकॉप्टरसह हवेत लटकत राहिला. अखेर जेव्हा हा व्यक्ती हेलिकॉप्टरमधून खाली पडला तेव्हा त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. ज्यानंतर त्याला हॉस्पिटलला नेले.
काही अज्ञातांनी Jacob Juma यांच्या गाडीवर गोळीबार केला होता त्यात त्यांचा मृत्यू झाला. केनियन व्यावसायिक जेकब हे सरकार विरोधक होते. त्यामुळे विरोधकांनी पोलिसांवरच हत्येचा आरोप लावला. त्यामुळे मोठा वाद झाला. बंगोमा कोर्टात Saleh Wanjala यांच्यावर स्वत:ची आणि हेलिकॉप्टर चालवणाऱ्या पायलटचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप करत खटला चालवण्यात आला.
त्यावेळी केनियाच्या अनेक मिडियाने ही माहिती देत या घटनेचा व्हिडिओ शेअर केला होता.
निष्कर्ष - केनियात २०१६ मध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीतला असल्याचा सांगात चुकीचा दावा करण्यात येत आहे.
(सदर फॅक्ट चेक 'आजतक' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)