Created By: Aaj TakTranslated By: ऑनलाइन लोकमत
देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, १ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होणार असून ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी एक्झिट पोल देण्यास सुरुवात केली आहे. तर राजकीय विश्लेषकांनी वेगवेगळे दावे करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बीबीसी'चा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.'बीबीसी'च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ३४७ आणि काँग्रेसला ८७ जागा दिल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये एक न्यूज अँकर इंग्रजीमध्ये या जागांचे नंबर देताना दिसत आहे.
सोशल मीडिया यूजर्संच्या मते हा बीबीसीचा एक्झिट पोल आहे. व्हिडीओवर लिहिले आहे की, “सत्यानाश बीबीसी तुमच्या स्वप्नातही राहुल'ला पंतप्रधान होऊ देणार नाहीत, किमान ४ तारखेपर्यंत तरी एन्जॉय करू दिले असते'. असं या पोस्टमध्ये लिहिले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडीओ शेअर करताना एका यूजरने लिहिले की, "बीबीसी'चा एक्झिट पोल." या पोस्टची आर्काइव्ह लिंक येथे पाहू शकता.
ही पोस्ट फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही शेअर करण्यात आली आहे. अशा पोस्टच्या आर्काइव्ह लिंक येथे पाहू शकता.
आज तक फॅक्ट चेकमध्ये आढळून आले की, व्हायरल व्हिडीओ बीबीसीच्या एक्झिट पोलचा नाही. या पाच वर्षे जुन्या व्हिडिओमध्ये अँकर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल सांगत आहेत.
सत्य कसे तपासले?
व्हायरल व्हिडिओची कीफ्रेम्स रिव्हर्स सर्च केल्यावर, आम्हाला त्याचा संपूर्ण भाग २३ मे २०१९ रोजी 'बीबीसी' न्यूजच्या अधिकृत YouTube चॅनेलवर अपलोड केलेला आढळला. या बातमीचे शीर्षक आहे, “भारताचे निवडणूक निकाल २०१९: मोदींचा मोठा विजय.” या व्हायरल व्हिडिओचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही हे येथे स्पष्ट झाले आहे.
ही बातमी पूर्ण पाहिल्यानंतर आम्हाला कळले की त्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकालबाबत देण्यात आले आहे. व्हायरल व्हिडीओ भाग ००:०३ मार्कपासून सुरू होतो. त्याआधी अँकर बोलतात, “आतापर्यंतचे निकाल पाहूया.” हा प्रारंभिक भाग व्हायरल व्हिडिओमधून काढून टाकण्यात आला आहे, त्यामुळे हा व्हिडीओ कोणत्या निवडणुकीच्या निकालाचा आहे हे कळू शकले नाही.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष एनडीएला ३५३ जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसच्या युपीएला ९१ जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यानंतर, मीडिया हाऊस संध्याकाळी एक्झिट पोल जारी करण्यास सुरवात करतात. बीबीसीच्या पाच वर्षे जुन्या वृत्ताला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा एक्झिट पोल म्हणत दिशाभूल करणारा दावा केला जात आहे.
(सदर फॅक्ट चेक Aaj Tak या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)