Created By: Vishvas News Translated By: ऑनलाइन लोकमत
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना दिसत आहेत.
विश्वास न्यूजने व्हायरल क्लिपची चौकशी केली असता त्यांच्या व्हिडिओशी छेडछाड करून व्हायरल क्लिप तयार केल्याचं आढळून आलं. मूळ क्लिपमध्ये राहुल गांधींनीकाँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याबाबत म्हटलं होतं.
काय होतंय व्हायरल?
व्हायरल फेसबुक पोस्ट २० मे रोजी 'अखंड भारत' नावाच्या एका ग्रुपने शेअर केली होती, ज्यामध्ये राहुल गांधी असं म्हणताना ऐकू येतं की, "नमस्कार, मी राहुल गांधी आहे, ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. एका बाजूला काँग्रेस पक्ष आणि I.N.D.I.A आघाडी लोकशाही नष्ट करण्याचा आणि राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे संविधान आणि लोकशाही वाचवणारे भाजपा आणि आरएसएस. काँग्रेस पक्षाने २२-२५ लोकांना अब्जाधीश बनवलं आहे, तर मोदीजी कोट्यवधी महिला आणि तरुणांना लखपती बनवणार आहेत. भाजपा आणि आरएसएसला साथ द्या, संविधान वाचवा. नरेंद्र मोदीजींचं बटण दाबा.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये "very important & last appeal msg from Rahul Gandhi" असं म्हटलं आहे.
पोस्टची अर्काइव्ह लिंक येथे पाहा.
तपास
पोस्टची तपासणी करण्यासाठी, आम्ही Google रिव्हर्स इमेजेसवर या क्लिपचा स्क्रीनशॉट शोधला. आम्हाला २५ एप्रिल रोजी राहुल गांधींनी केलेल्या ट्विटमध्ये व्हायरल क्लिप सापडली. १ मिनिट ७ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, "नमस्कार राहुल गांधी, ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. एका बाजूला भाजपा आणि आरएसएस लोकशाही नष्ट करण्याचा आणि संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला संविधान आणि लोकशाही वाचवणारी काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी आहे. कन्याकुमारी ते काश्मीर, आम्ही ४००० किलोमीटर चाललो, मणिपूर ते महाराष्ट्र, तुमच्याशी बोलून आणि तुमच्या अंतःकरणात काय आहे ते ऐकून आम्ही क्रांतिकारी जाहीरनामा तयार केला आहे. हा तुमचा जाहीरनामा आहे. काँग्रेस पक्षाने केला आहे पण आवाज तुमचा आहे, आम्ही पाच हमीपत्र दिले आहेत. नरेंद्र मोदीजींनी २२-२५ लोकांना अब्जाधीश बनवले आहे. आम्ही कोट्यवधी महिला आणि तरुणांना लखपती बनवणार आहोत. शेतकऱ्यांना कायदेशीर MSP देण्यात येत आहे. त्यांचे कर्ज माफ करावे. जर ते कामगारांना किमान ४०० रुपये देत असतील तर हा देश बदलण्याचा जाहीरनामा आहे. हा क्रांतिकारी जाहीरनामा आहे, काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्या. संविधान वाचवा आणि हाताचं बटण दाबा."
आम्हाला २५ एप्रिल रोजी राहुल गांधींच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केलेला हा व्हिडीओ देखील आढळला. येथेही त्यांनी काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याबाबत म्हटलं आहे. या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, “संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी या निवडणुकीत, मित्र काळातून बाहेर पडून भारतीयांचं सरकार स्थापन करण्यासाठी… लोकशाहीचं आपलं कर्तव्य पार पाडा, काँग्रेससोबत या, हाताचं बटण दाबा. जय हिंद."
विश्वास न्यूजने तपास पुढे नेत काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे गिरीश कुमार यांच्याशी संपर्क साधला. व्हायरल क्लिप एडिटेड केल्याचं सांगत, त्यांनी २५ एप्रिल रोजी राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेली मूळ क्लिप आमच्यासोबत शेअर केली.
तपासाअंती एडिटेड व्हिडीओ शेअर करणाऱ्या अखंड भारत या फेसबुक ग्रुपची चौकशी करण्यात आली. या ग्रुपमध्ये 60000 हून अधिक सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.
निष्कर्ष
विश्वास न्यूजने व्हायरल झालेल्या पोस्टची तपासणी केली असता तो व्हिडीओ एडिट केलेला आढळून आला. मूळ क्लिपमध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेस-इंडिया आघाडीचे समर्थन करताना भाजपा आणि आरएसएस लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.
(सदर फॅक्ट चेक Vishvas News या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)