Created By: Logically FactsTranslated By: ऑनलाइन लोकमत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्यामध्ये मोदी असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) याचं समर्थन करताना दाखवलं जात आहे. व्हिडिओमध्ये, "तेलंगणा म्हणतंय काँग्रेस नको, बीआरएस नको, भाजपा नको, एमआयएमलाच मत देणार, एमआयएमलाच जिंकवणार" असं पंतप्रधान मोदी म्हणत असल्याचं पाहायला मिळत आहे.
व्हिडिओवर "हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिला" असा टेक्स्ट लिहिलेला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) आणि फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करत, युजर्स हैदराबादमध्ये मोदींनी ओवेसी यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा दावा करत आहेत. या पोस्टचं अर्काइव व्हर्जन येथे, येथे आणि येथे पाहा.
व्हायरल पोस्टचा स्क्रिनशॉट
मात्र, व्हायरल होत असलेला व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. मूळ व्हिडिओमध्ये, पंतप्रधान मोदींनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) ला नाही तर भारतीय जनता पक्षाला (भाजपा) मतदान करण्यास सांगितलं होतं.
आम्ही सत्य कसं शोधलं?
आम्ही संबंधित कीवर्डद्वारे शोधलं असता, आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत YouTube चॅनेलवर 10 मे 2024 रोजीच्या व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओची मोठी व्हर्जन सापडलं. या व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, 10 मे 2024 रोजी हैदराबादमध्ये झालेल्या भाजपाच्या रॅलीचा हा व्हिडीओ आहे.
या व्हिडिओमध्ये (अर्काइव येथे) 12:49 हा वेळेवर पीएम मोदी स्थानिक बोली भाषेत म्हणतात "तेलंगणा म्हणतंय काँग्रेस नको, बीआरएस नको, एमआयएम नको, भाजपाला मत देणार, भाजपालाच विजयी करणार."
येथे हे स्पष्ट होतं की व्हायरल व्हिडिओमध्ये 'भाजपा' हा शब्द काढून त्याच्या जागी 'एमआयएम' जोडण्यात आला आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी एमआयएमला पाठिंबा दिल्याचे दिसतं. तर मूळ व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे की, त्यांनी तेलंगणातील जनतेला भाजपाला मत देऊन विजय मिळवून देण्याबाबत भाष्य केलं आहे. शिवाय, संपूर्ण भाषणात कुठेही मोदींनी असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाचे समर्थन केलेले नाही.
13 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्याचा भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी हे विधान केलं होतं.
द स्टेट्समन आणि सियासत डेलीसह अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या या भागाचा उल्लेख करण्यात आला आहे.
निर्णय
तेलंगणात असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM ला पाठिंबा दिल्याचा दावा करत पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पण खरं तर त्यांनी भाजपाला मतदान करून विजयी करण्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही व्हायरल केलेला दावा चुकीचा असल्याचं मानतो.
(सदर फॅक्ट चेक Logically Facts या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)