Created By: Aaj TakTranslated By: ऑनलाइन लोकमत
Fact Check : नुकतीच बंगळुरू येथील एका कंपनीत काम करणाऱ्या अतुल सुभाष नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी, त्यांनी २४ पानांची सुसाईड नोट आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याची पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांवर मानसिक छळ, पैशांची खंडणी आणि खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी निकिता सिंघानिया आणि त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
अतुल सुभाषच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर काही लोक पत्नी निकिताला शिवीगाळ देत आहेत आणि अतुलच्या मृत्यूसाठी तिला जबाबदार धरत आहेत. तर काही लोक एका मुलीचा फोटो शेअर करत तिला अतुलची पत्नी निकिता म्हणत आहेत. फोटोमध्ये दिसत असलेल्या मुलीने पांढरा-गुलाबी रंगाचा पट्टे असलेला ड्रेस आणि गॉगल घातलेला आहे.
वेबदुनिया आणि अमर उजाला सारख्या माध्यमांनीही याचा अतुलच्या पत्नीच्या फोटो असे वर्णन केले आहे.
सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत अनेक जण संताप व्यक्त करत असून महिलेला लक्ष्य करत असभ्य कमेंट करत आहेत. याशिवाय अनेक लोक बंगळुरू पोलिसांना टॅग करत महिलेला अटक करण्याचे आवाहन करत आहेत. अशाच एका पोस्टचे अर्काईव्ह व्हर्जन येथे पाहू शकता.
आज तकच्या फॅक्ट चेकनुसार फोटोमध्ये दिसणारी मुलगी अतुलची पत्नी निकिता सिंघानिया नाही. खुद्द अतुलचा भाऊ विकास मोदी यांनी आज तकला ही माहिती दिली आहे.
सत्य कसं कळाले?
आम्ही पाहिले की काही सोशल मीडिया युजर्सनी व्हायरल फोटो पोस्ट करताना ती दुसरी मुलगी असल्याचे लिहिले आहे.
या माहितीच्या आधारे शोध घेत असताना आम्हाला एक इन्स्टाग्राम अकाऊंट सापडले ज्याच्या प्रोफाइल पिक्चरमध्ये व्हायरल फोटो आहे. या प्रोफाइलचे नाव निकिता सिंघानिया आणि लोकेशन रायपूर असे लिहिले आहे.
याशिवाय, आम्हाला एका फेसबुक पेजचा डीपी म्हणून पोस्ट केलेला व्हायरल फोटो देखील सापडला. इथेही नाव निकिता सिंघानिया आणि लोकेशन रायपूर असे लिहिले आहे. हे दोन्ही अकाऊंट प्रायव्हेट आहेत. आम्ही या अकाऊंटशी संपर्क साधला आहे. उत्तर आल्यावर बातम्यांमध्ये अपडेट केले जाईल.
माध्यमांच्या वृत्तानुसार, अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया दिल्लीतील एक्सेंचर कंपनीत काम करते. तर, निकिताचे कुटुंब उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहते. अतुलची पत्नी निकिता हिचा रायपूरशी संबंध असल्याबाबतची कोणतीही बातमी आम्हाला आढळली नाही.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही अतुलचा भाऊ विकास मोदी यांच्याशी संपर्क साधला. त्याने सांगितले की, व्हायरल झालेला फोटो त्याची वहिणी निकिताचा नाही.
मात्र, विकासने बातम्यांमध्ये वापरला जाणारा दुसरा फोटो निकिता सिंघानियाचा खरा फोटो असल्याचे सांगितले आहे.
याशिवाय आज तकचे समस्तीपूरचे वार्ताहर जहांगीर यांनीही आम्हाला अतुल-निकिताचा फोटो पाठवला होता. महत्त्वाचे म्हणजे अतुल सुभाष हे मूळचे बिहारमधील समस्तीपूर येथील आहेत.
आम्ही व्हायरल फोटोची तुलना त्या फोटोशी केली आहे ज्याचे वर्णन विकास मोदी यांनी निकिताचा खरा फोटो म्हणून केले आहे. याशिवाय, आम्ही व्हायरल फोटोची तुलना जहांगीरने पाठवलेल्या फोटोशी केली. यावरून व्हायरल फोटोमध्ये दिसणारी मुलगी इतर दोन फोटोंमध्ये दिसणाऱ्या मुलीपेक्षा वेगळी असल्याचे स्पष्ट होते.
अशाप्रकारे दुसऱ्याच मुलीचा फोटो शेअर करून तिचे वर्णन अतुल सुभाष यांची पत्नी निकिता असे केले जात असल्याचे सिद्ध झाले आहे, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
(सदर फॅक्ट चेक Aaj Tak या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)