Created By: BOOM Translated By: ऑनलाईन लोकमत
सोशल मीडियावर सध्या एका रॅलीचा फोटो व्हायरल होत आहे. नागपूर हिंसाचारानंतर मराठा समाजाची लोक नागपूरच्या दिशेने जात असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात येत आहे. जवळपास ३० सेकंदाच्या या व्हिडिओत भगवे उपरणे आणि सफेद टोपी घातलेले लोक, त्यांच्या हातात काठी घेऊन जाताना दिसतात.
या व्हिडिओची पडताळणी केली असता हा व्हिडिओ याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात असल्याचं समोर आले. रायगडला धारातीर्थ गडकोट मोहिमेतर्गत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून या रॅलीचे आयोजन केले होते. त्याचा नागपूर हिंसाचाराशी कुठलाही संबंध नाही. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही सांगलीतील संभाजी भिडे यांची संघटना आहे.
महाराष्ट्रातील नागपूर येथे १७ मार्च रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी मुघल शासक औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत मोर्चा काढला होता. यावेळी औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला. यातच एक अफवा पसरल्याने काही समाजकंटकांनी हिंसा भडकवण्याचं काम केले. या वेळी तोडफोड, जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी जवळपास ११४ जणांना अटकही करण्यात आली आहे.
सोशल मीडिया एक्सवर एका युजरने लिहिलंय की, 'ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव जय भवानी जय शिवाजी असं म्हणत मराठा नागपूरच्या दिशेने जात आहे, जिसका डर था वही हुआ, पूरा महाराष्ट्र पिटेगा अब मराठा आले..असा दावा करण्यात आला.
पोस्टची अर्काइव्ह लिंक इथं पाहा
सत्यता कशी पडताळली?
व्हायरल व्हिडिओतील एक कीफ्रेम रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर इन्स्टाग्रामवर १४ फेब्रुवारीची एक पोस्ट दिसली. त्यात व्हिडिओ सापडला ज्यात व्हायरल व्हिडिओतील काही दृश्ये आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ फेब्रुवारीत इंटरनेटवर उपलब्ध होता तर नागपूर हिंसाचार १७ मार्च रोजी घडला.
या व्हिडिओच्या मराठी कॅप्शनमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ गडकोट मोहीम २०२५, रायगड असा उल्लेख आहे.
इथूनच हिंट घेऊन जेव्हा संबंधित किवर्ड गुगलला सर्च केले. तेव्हा एबीपी माझाच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर हाच व्हिडिओ सापडला. इथेही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गडकोट मोहीम, रायगडावर संभाजी भिंडेंचे धारकरी असा उल्लेख आढळला. रायगडमध्ये ११ फेब्रुवारीला काढलेला हा व्हिडिओ आहे.
एबीपी माझाच्या अन्य रिपोर्टनुसार, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची धारातीर्थ मोहीम ११ फेब्रुवारीला रायगडावर संपन्न झाली. याठिकाणी १ लाखाहून अधिक शिवभक्त उपस्थित होते. ही रॅली ७ फेब्रुवारीला नरवीर तानाजी मालुसरे समाधीपासून सुरू झाली होती ती ११ फेब्रुवारी २०२५ रोजी रायगडावर संपली. या रिपोर्टमध्ये संभाजी भिडे लोकांना संबोधित करतानाही दिसून येतात. त्यात दारूचं व्यसन, गो हत्यासारख्या मुद्द्यावर चिंता व्यक्त करतात. याचे अनेक व्हिडिओ, फोटो आहेत. संबंधित बातम्या इथं आणि इथं पाहू शकता.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही हिंदुत्ववादी विचारधारेवर आधारीत संघटना आहे. ज्याची स्थापना संभाजी भिडे यांनी केली आहे. भिडे यांच्या नेतृत्वात दरवर्षी ही मोहीम काढली जाते. धारातीर्थ गडकोट मोहीमेत लाखो भिडे समर्थक सहभागी होतात. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानशी निगडीत इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याबाबत अनेक व्हिडिओ पाहू शकतात.
(सदर फॅक्ट चेक BOOM या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)