Created By: आज तक फॅक्ट चेकTranslated By: ऑनलाइन लोकमत
मंडीतील भाजपा खासदार कंगना राणौत यांना कानशिलात मारणाऱ्या CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौरची आई असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही महिलापंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह घोषणा देताना दिसत आहेत. असे म्हटले जात आहे की, त्या कुलविंदर कौरच्या आई आहेत, ज्यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान या घोषणा दिल्या होत्या. पण व्हायरल झालेला व्हिडिओ पंजाब केसरीच्या जुन्या रिपोर्टचा आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ शेअर करताना, एका युजरने लिहिले, "पंजाबमध्ये 'मर जा मोदी, मर जा मोदी'चा नारा देणारी महिला कंगना राणौतला कानशिलात लगावणाऱ्या CISF कॉन्स्टेबलची आई असल्याचे समोर आले आहे. ही महिला कशा वातावरणात राहते, हे आता तुम्हाला कळले असेलच.'' हा व्हायरल व्हिडिओ या दाव्यासह फेसबुकवरही शेअर करण्यात आला आहे. व्हायरल पोस्टची अर्काईव्ह आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.
२०२०-२१ मध्ये शेतकरी आंदोलनाकर्त्या तिथे बसलेल्या महिला प्रत्येकी १०० रुपये घेऊन आंदोलन करतात असा दावा कंगना रणौतने केला होता. चंदीगड विमानतळाचा वाद उघडकीस आल्यानंतर, कुलविंदर कौर एका व्हिडिओमध्ये असे म्हणताना दिसत होती की, कंगनाने ज्या महिलांसाठी हे वक्तव्य केले होते, त्यामध्ये तिची आई देखील आहे.
PM मोदींविरोधात घोषणाबाजी करणारी महिला ही कुलविंदर कौरची आई नसून ट्रेड युनियन नेत्या उषा राणी असल्याचे आज तक फॅक्ट चेकमध्ये आढळून आले आहे.
सत्य कसे समजले?
शेतकरी आंदोलन आणि पंजाब केसरीशी संबंधित कीवर्डच्या आधारे शोध घेतल्यानंतर, आम्हाला पंजाब केसरीच्या यूट्यूब चॅनेलवर व्हायरल व्हिडिओचा संपूर्ण भाग सापडला. तो व्हिडीओ १४ डिसेंबर २०२० रोजी येथे अपलोड केले होता.
अधिक शोध घेतल्यानंतर, आम्हाला १४ डिसेंबर २०२० रोजीचा “न्यूज तक” चा व्हिडिओ रिपोर्ट सापडला. या रिपोर्टमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओचे वर्णन दिल्ली-जयपूर महामार्गावरील शेतकऱ्यांचे आंदोलन असे करण्यात आले होते. नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू झाले होते.
“न्यूज तक” च्या रिपोर्टमध्ये आम्ही अखिल भारतीय किसान सभेचे झेंडे पाहिले. यासोबतच आम्हाला एक बॅनर दिसला ज्यावर “शेतकरी आंदोलन, घरसाना ते दिल्ली (राजस्थान)” असे लिहिले होते. या माहितीच्या आधारे आम्ही या भागातील शेतकरी नेत्यांशी बोललो. अखिल भारतीय किसान सभेचे नेते सुमित यांनी आम्हाला सांगितले की, व्हायरल व्हिडिओमध्ये उभी असलेली आणि घोषणा देणारी महिला उषा राणी आहे.
मग उषा राणी यांच्याशी संपर्क साधला. आज तकशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्या सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या (सीटू) राष्ट्रीय सचिव आहेत. व्हिडिओमध्ये घोषणा देणारी महिला आपणच असल्याची पुष्टी त्यांनी केली. उषा यांनी सांगितले की, हा व्हिडिओ १३ डिसेंबर २०२० चा आहे, जेव्हा राजस्थानमधील महिला दिल्ली-जयपूर महामार्गावर असलेल्या शाहजहानपूर सीमेवर शेतकरी आंदोलनात सामील झाल्या होत्या.
या काळात कॉन्स्टेबल कुलविंदर कौरची आई देखील त्यांच्यासोबत होती का, असे आम्ही उषा राणी यांना विचारले असता, उषा म्हणाल्या की पंजाबमधील एकही महिला शेतकरी त्यांच्यासोबत नव्हती.
उषा राणी यांनी “एबीपी सांझा” चा त्याच वेळेचा एक रिपोर्ट पाठवला, ज्यामध्ये त्या व्हायरल व्हिडिओ मधील कपडे परिधान केलेल्या दिसल्या.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कुलविंदर कौरची आई कोण आहे?
बीबीसीच्या एका व्हिडिओ रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, कुलविंदर कौर ही पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील महिवाल गावातील आहे. बीबीसीने कुलविंदरचा भाऊ शेर सिंग आणि आई वीर कौर यांच्याशी संवाद साधला. वीर कौर यांनी सांगितले की, शेतकरी आंदोलनादरम्यान त्या आपली जमीन वाचवण्यासाठी सीमेवर आंदोलनासाठी बसल्या होत्या.
उषा राणी आणि कुलविंदर कौर यांच्या चेहऱ्याबाबत सर्च केली असता हे स्पष्ट झाले की पीएम मोदींविरोधात घोषणा देणारी महिला CISF कॉन्स्टेबलची आई वीर कौर नाही.
यानंतर आम्ही आज तकचे कपूरथला प्रतिनिधी सुकेश गुप्ता यांच्यामार्फत कुलविंदर कौरच्या आईशी बोललो. आज तकशी बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकरी आंदोलनादरम्यान मी सिंघू सीमेवर आंदोलन करत होते. त्या राजस्थानच्या शाहजहांपूर सीमेवर गेल्या नसल्याचेही त्यांनी सांगितले.
निष्कर्ष: शेतकरी आंदोलनात पीएम मोदींच्या विरोधात घोषणा देणारी ती महिला कुलविंदर कौरची आई असल्याचा दावा खोटा आहे.
(सदर फॅक्ट चेक 'आज तक फॅक्ट चेक' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.)