नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून वर्क फ्रॉम होमबाबत व्हॉट्सअॅपवरएक मेसेज व्हायरल होत आहे. केंद्र सरकार एका संघटनेच्या सहकार्याने घरातून काम करण्याची संधी देत असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. मात्र सरकारकडून आता या मेसेजवर स्पष्टीकरण आलं असून, हा मेसेज खोटा असल्याचे सरकारने सांगितले आहे. (Fact Check Of WhatsApp Message) अशा प्रकारची कुठलीही योजना आणण्यात आली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रेस इन्फाॅर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक विभागाने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात सरकारकडून अशा प्रकारची कुठलीही योजना आणण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फसवणूक करणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. (Work from Home Scheme introduced by Central Government? Find out the truth behind the viral message)
कोरोनाच्या महामारीमुळे अनेक नोकऱ्यांमध्ये घरातून काम करण्याची संधी मिळत आहे. जवळपास एक वर्ष उलटले तरी अनेक कार्यालयांमधील कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये फसवणुकीच्या हेतूने पसरवलेले मेसेज खरे वाटू शकतात. पीआयबीने फॅक्ट चेकमधून हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. तसेच भारत सरकारने अशा कुठल्याही योजनेची घोषणा केली नसल्याचे सांगितले.
महत्त्वाची बाब म्हणजे सरकारशी संबंधित घोषणा ह्या संबंधित मंत्रालये आणि विभागांच्या अधिकृत संकेतस्थळांवरून होत असतात. किंवा संस्थांच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाऊंटवरून होत असतात.