मुंबई - ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी मुंबईच्या खारघर येथे झालेल्या या कार्यक्रमात लाखो अनुयायांच्या उपस्थितीत आप्पासाहेबांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. परंतु, या सोहळ्यादरम्यान १४ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे आणि यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेला धारेवर धरले आहे.
या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज व्हायरल होत आहेत. यात, आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा फोटो आणि 'लोकमत'चा लोगो असलेला एक फोटोही अनेक ग्रूप वर शेअर होतोय. भाजपा आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असं आवाहन धर्माधिकारी यांनी केल्याचा दावा या फोटोच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मात्र, जुन्या फोटोवरील मजकूर बदलून ही दिशाभूल करण्यात येत आहे.
जाणून घ्या फोटोचं सत्य
२०२० मध्ये संपूर्ण जगासह भारतातही कोरोनानं थैमान घातले होते. महाराष्ट्रातही अनेक कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते. त्यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी लोकांना आवाहन केले होते. त्यात आप्पासाहेब म्हणाले होते की, जनतेने वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा. गर्दीत जाणे टाळावे. हस्तांदोलन करण्यापेक्षा नमस्कार करावे. समाजाने कोरोनाबाबत भीती न बाळगता आवश्यक ती काळजी घ्यावी. गर्दीत जाणे टाळावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. घरातच राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. आपण सर्व मिळून कोरोनावर मात करू असा विश्वास आहे हा संदेत जगभरात वाढणाऱ्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिला होता.
हा व्हिडिओ लोकमतच्या यूट्यूब चॅनेलवर ३० मार्च २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यासाठी जी थंबनेल इमेज आम्ही वापरली होती ती खाली देत आहोत.
याच इमेजवर "भाजपा आणि शिंदे गटाला मतदान करू नका" या दोन ओळी जोडून चुकीचा मेसेज पसरविण्यात येत आहे.
ही इमेज आपल्यापर्यंत आल्यास ती फॉरवर्ड न करता, त्या ऐवजी ही सत्य माहिती शेअर करावी.
दरम्यान, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान घडलेल्या दुर्घटनेबद्दल आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी एका पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 'ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे', अशा शब्दांत त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलं होतं. तसंच, झाला प्रकार दुर्दैवीच होता, त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.