आपल्या सोयीनुसार आणि एका क्लिकवर टॅक्सी बुक करण्याची सेवा Ola आणि Uber कंपन्यांनी उपलब्ध करुन दिली. त्यास देशात मोठा प्रतिसादही मिळाला. याच कंपन्यांना आता टक्कर देण्यासाठी देशातील प्रतिष्ठीत Tata कंपनीनंही Cab E नावानं मुंबई आणि पुण्यात टॅक्सी सेवा देण्यास सुरुवात केल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या मेसेजचं सत्य जाणून घेण्याचा 'लोकमत'नं प्रयत्न केला असता संबंधित मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचं निष्पन्न झालं आहे.
दावा काय?देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा उद्योग समूहानं मुंबई आणि पुण्यात Cab E नावानं टॅक्सी सेवा देणारी कंपनी सुरू केली असून ओला आणि उबर सेवेपेक्षा चांगला पर्याय देण्याचा टाटांनी प्रयत्न केला आहे. रतन टाटा नेहमीच देशवासियांना कठीण काळात मदत करत आले आहेत. त्यामुळे या सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा आणि मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा, असं आवाहन करणारा एक मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. यासोबत Cab E च्या App ची डाऊनलोड लिंक देखील देण्यात आली आहे.
कशी केली पडताळणी?व्हॉट्सअॅपवर ज्या Cab E नावानं मेसेज व्हायरल झाला आहे. त्याच कंपनीचं अधिकृत संकेतस्थळ https://www.cabecars.in/ उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर कंपनीची संपूर्ण माहिती about सेक्शनमध्ये देण्यात आली आहे. यातील माहितीनुसार CAB-EEZ Infra Tech (P) Limited (Brand Name: “Cab-e”) ही स्वतंत्र कंपनी असून या कंपनीचा Tata या कंपनीशी कोणताही संबंध असल्याचं येथे नमूद करण्यात आलेलं नाही.
संकेतस्थळावर कंपनीच्या संस्थापकांचीही माहिती देण्यात आली आहे. https://www.cabecars.in/OurTeam/ येथे देण्यात आलेल्या माहितीनुसार कुलदीप घोष हे कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. तर इंद्रनील चक्रवर्ती हे सहसंस्थापक, सीओओ आणि सीएचआरओ आहेत. तसंच नितीन शर्मा हे कंपनीचे सहसंस्थापक आणि सीएफओ पदावर कार्यरत आहेत. येथे रतन टाटा किंवा त्यांच्या कंपनीशी निगडीत कोणत्याही सदस्याचा समावेश नसल्याचं आढळून आलं.
Cab-E कंपनीचं फेसबुकवरही पेज उपलब्ध आहे. त्यावर कंपनीनं स्वत: त्यांच्या नावानं व्हायरल होत असलेल्या मेसेजवर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. यात Cab-E कंपनी ही एक खासगी संस्था असून टाटा कंपनीचा यात कोणताही सहभाग नाही असं स्पष्ट केलं आहे.Cab-E कंपनीनं दिलेलं स्पष्टीकरण- https://bit.ly/3tT7nyr
महत्वाची बाब अशी की टाटा मोटर्सच्या टीमशी 'लोकमत डॉट कॉम'ने संपर्क साधला असता, हा मेसेज पूर्णपणे चुकीचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
निष्कर्ष: Cab E नावानं इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा देणाऱ्या खासगी कंपनीचा टाटा कंपनीशी कोणताही संबंध नाही.