मुंबई-
सोशल मीडियात सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. यात भारतरत्न सचिन तेंडुलकरनं पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला खांदा दिला असा दावा केला जात आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्यविधीवेळी सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होता असा दावा केला जात आहे. पण 'लोकमत'नं याबाबची सत्य पडताळणी केली असता सचिनचा फोटो शेअर करुन केला जाणारा दावा खोटा असल्याचं निष्पन्न झालं आहे. पुण्यात सिंधुताई सपकाळ यांच्या महानुभाव पंथानुसार अंत्यविधी करण्यात आले. यावेळी सचिन तेंडुलकर उपस्थित नव्हता.
व्हायरल पोस्टमध्ये केलेला दावा काय?फेसबुकवर नारायण बोरुडे नावाच्या प्रोफाइलवर सचिन तेंडुलकर एका पार्थिवाला खांदा देत असतानाचा फोटो शेअर करण्यात आला असून पोस्टच्या कॅप्शनमध्ये "खरा भारतरत्न !!! अभिमान आहे तुझा सर्व भारतियांना !!! सलाम !!!", असं नमूद करण्यात आलं आहे. तर व्हॉट्सअॅपवरही सचिनचा हाच फोटो व्हायरल होत असून त्यात "आज एक गोष्ट समजली...पुरस्कार महत्त्वाचा नसून कर्तृत्व महत्त्वाचं असतं...कारण आज एका पद्मश्रीला भारतरत्नाने खांदा दिला.. भावपूर्ण श्रद्धांजली माई...", असं कॅप्शन दिलं आहे. (सिंधुताई सपकाळ यांना प्रेमानं माई असं म्हटलं जायचं) सिंधुताईंच्या पार्थिवाला सचिन तेंडुलकरनं खांदा दिला या दाव्यानं ही पोस्ट व्हायरल केली जात आहे.
संबंधित पोस्ट आणि अर्काइव्ह लिंक येथे क्लिक करुन पाहता येईल.
सत्य काय?संबंधित पोस्टमध्ये केल्या गेलेल्या दाव्याची पडताळणी 'लोकमत'नं केली. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्यसंस्कारासाठी सचिन तेंडुलकर उपस्थित नव्हता याची माहिती मिळाली. त्यामुळे केला गेलेला दावा खोटा असल्याचं लक्षात आलं. तसंच व्हायरल करण्यात आलेल्या फोटोचं सत्य पडताळून पाहिलं असता संबंधित फोटो सचिनचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या अंत्यसंस्कारावेळीचा असल्याचं समोर आलं आहे.
सचिनचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं २ जानेवारी २०१९ रोजी मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं होतं. रमाकांत आचरेकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी सचिनसह अनेक राजकीय नेते मंडळी आणि मुंबई क्रिकेटमध्ये आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले माजी खेळाडू देखील उपस्थित होते. आचरेकरांच्या निधनाची आणि अंत्यसंस्काराची बातमी 'लोकमत'नंही प्रसिद्ध केली होती. त्याचा स्क्रिनशॉट आणि लिंक खाली नमूद केली आहे. यात आपल्याला सचिनननं आचरेकरांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचा तोच फोटो पाहायला मिळतो आणि बातमीची वेळ आणि दिनांक पाहिली तर संबंधित फोटो व बातमी ३ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध झाल्याचं सिद्ध होतं.
बातमीच्या लिंकसाठी येथे क्लिक करा
याशिवाय रमाकांत आचरेकर त्यांच्या खास टोपीसाठी देखील ओळखले जायचे. गुगलवर त्यांचे अनेक फोटो देखील सापडतील. त्यातलाच एक फोटो खाली दिला आहे. तर एका बाजूला सचिननं खांदा दिलेल्या पार्थिवावरही टोपी असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
रमाकांत आचरेकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी सचिनसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होत असल्याचा व्हिडिओ देखील लोकमतच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतो.
निष्कर्ष: माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानं ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचा व्हायरल पोस्टमधील दावा खोटा आहे.