कर्नाटकातील हिजाब वादावरुन सध्या सोशल मीडियात वेगवेगळे व्हिडिओ हे वेगवेगळ्या दाव्यांसह व्हायरल केले जात आहेत. यामुळे अनेक चुकीची मतं आणि प्रचार केला जात आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून यात कर्नाटकात हिंदूंचा भव्य मोर्चा आयोजित केल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिली असता यामागचं सत्य समोर आलं आहे आणि फेसबुकवर खोट्या दाव्यासह व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओ कर्नाटकातील नसल्याचं सिद्ध झालं आहे.
दावा काय?कर्नाटकात हिंदूंचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे असा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. १०० करोड हिंदुओं की ग्रुप अशा नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
पडताळणीत काय समजलं?व्हिडिओची पडताळणी करताना गुगल रिव्हर्स इमेज सर्च टूलचा वापर करण्यात आला आणि यातून संबंधित व्हिडिओशी मिळते-जुळते व्हिडिओ दिसून आले. हे सर्व व्हिडिओ मुंबईतील मराठा मोर्चाचे असल्याचा उल्लेख या सर्व व्हिडिओंमध्ये करण्यात आला होता. मराठी आणि हिंदीसह बहुतांश वृत्तवाहिन्यांनी मराठी मोर्चाचं वृत्तांकन केलं होतं आणि त्यातीलच व्हिडिओची क्लिप कर्नाटकामधील मोर्चा असल्याच्या खोट्या दाव्यानं शेअर केली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. मुंबईत ९ ऑगस्ट २०१७ रोजी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भव्य मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं. मुंबईत भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात आला होता. कर्नाटकातील व्हिडिओ सांगून व्हायरल केल्या जाणाऱ्या व्हिडिओतील जागा मुंबईतील जे.जे.उड्डाण पुलावरील असून या पुलावरुन मोर्चा मार्गस्थ होत आझाद मैदानात पोहोचला होता.
निष्कर्षः कर्नाटकातील हिंदूंचा मोर्चा या दाव्यानं व्हायरल होत असलेला व्हिडिओ ९ ऑगस्ट २०१७ साली मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचं सिद्ध झालं.