Created By: Logically FactsTranslated By: ऑनलाइन लोकमत
सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका सोसायटीमध्ये 'जय श्रीराम'च्या घोषणा आणि 'हिंदुत्वा'च्या समर्थनार्थ गाणे लावलेले आहे आणि फ्लॅटच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या लोकांना 'देशप्रेम' लक्षात घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. हा व्हिडिओ २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी संबंधित असल्याचा आणि तो महाराष्ट्रातील सोसायटीतील असल्याचा दावा केला जात आहे.
ट्विटरवरील एका युजरने 'महाराष्ट्राचा मूड. महाराष्ट्र निवडणुकीचा अतिशय सुंदर पद्धतीने प्रचार सुरु आहे' अशा कॅप्शनसह व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टला आतापर्यंत २ लाख ६७ हजार व्ह्यूज, ३ हजार ७०० रिपोस्ट आणि १२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अर्काईव्ह पोस्ट इथे पाहा. इतर पोस्ट येथे आणि येथे पाहा.
हा व्हिडिओ देखील याच दाव्याने फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, जो येथे आणि येथे पाहता येईल.
इंडिया न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीनेही व्हिडिओ शेअर केला असून तो महाराष्ट्रातील असल्याचा दावा केला आहे. मात्र, व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा कानपूर, उत्तर प्रदेशचा असून तो २०२२च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान रेकॉर्ड करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
सत्य पडताळणी
आम्ही रिव्हर्स इमेज सर्च वापरून व्हिडिओचे कीफ्रेम शोधले आणि 'प्रभात फेरी, कानपूर' पश्चिम' या शीर्षकासह 'विश्व हिंदू परिषद बजरंग दल ब्लॉक बनखोह' नावाच्या फेसबुक पेजवर १५ फेब्रुवारी २०२२ ( अर्काईव्ह पोस्ट ) ची पोस्ट आढळले. हा व्हिडिओ दोन वर्षांहून अधिक काळ इंटरनेटवर असल्याने त्याचा २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.
तपासादरम्यान, आम्हाला हा व्हिडिओ १२ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या पोस्टमध्ये देखील आढळला ( अर्काईव्ह पोस्ट ), ज्यामध्ये अनेक प्रतिमा देखील सामायिक केल्या गेल्या होत्या. कल्याणपूरच्या गौतम नगर परिसरात असलेल्या नवशीलधाम सोसायटी, रतन ऑर्बिट अपार्टमेंट, कान्हा श्याम अपार्टमेंट, डिव्हिनिटी होम अपार्टमेंटसह अनेक ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभातफेरीची जयघोषाने सांगता झाल्याची माहिती पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
गुगलवरील फेसबुक पोस्टमध्ये नमूद केलेल्या सोसायटीच्या प्रतिमा शोधून, आम्ही व्हिडिओमध्ये दिसलेल्या इमारतींशी त्यांची जुळवाजुळव केली आणि आम्हाला आढळले की हा व्हिडिओ डिव्हिनिटी होम्स सोसायटीमध्ये रेकॉर्ड केला गेला होता, ज्याची सोसायटीच्या फेसबुक पेज वर पुष्टी झाली होती ( अर्काईव्ह ) छायाचित्रांवरून घडले.
यानंतर जेव्हा गुगल मॅपवर ही सोसायटी शोधली, तेव्हा ती कानपूरच्या इंदिरा नगर रोडवर असल्याचे आढळले.
याशिवाय आमच्या तपासातून असेही समोर आले आहे की, व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या शेवटी २० तारखेला मतदान करण्याचे आवाहन केले गेले आहे, तो प्रत्यक्षात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी संबंधित आहे. २०२२ यूपी विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी २० फेब्रुवारी २०२२ रोजी कानपूरसह १६ जिल्ह्यांतील ५९ जागांवर मतदान झाले.
निष्कर्ष
सत्य पडताळणीतून हे स्पष्ट झाले की हा व्हायरल व्हिडीओ दोन वर्षांहून जुना आहे आणि महाराष्ट्रातील नसून उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका सोसायटीमधील आहे. याचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही.
(सदर फॅक्ट चेक LogicallyFacts या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)