Fact Check: मोदींची पत्नी जशोदाबेन यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याचा दावा खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्टमागचे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 05:51 PM2024-04-01T17:51:06+5:302024-04-01T18:02:57+5:30

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर अनेक पक्षांमध्ये विविध लोक पक्षप्रवेश करताना दिसत आहेत.

Pm Modi wife Jashodaben joining congress claim is false | Fact Check: मोदींची पत्नी जशोदाबेन यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याचा दावा खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्टमागचे सत्य

Fact Check: मोदींची पत्नी जशोदाबेन यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याचा दावा खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्टमागचे सत्य

Created By: फॅक्ट क्रेसेंडो
Translated By: ऑनलाइन लोकमत

देशात काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले. प्रचार सभांपासून ते रॅली आणि इतर प्रचार कार्यक्रमांना वेगाने सुरुवात झाली आहे. प्रत्येक टप्प्यातील निवडणुकांसाठी विविध पक्ष आपले उमेदवार टप्प्याटप्प्याने जाहीर करत आहेत. त्यामुळेच पक्षाकडून तिकीट कापलेले अनेक उमेदवार दुसऱ्या पक्षात प्रवेश करतानाही सर्रास दिसत आहेत. याच दरम्यान काही ठिकाणी तुम्हाला पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्याबद्दल एक वेगळीच बातमी दिसली असेल.

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन या राजकारणात कधीच फारशा सक्रिय नव्हत्या. पण अचानक जशोदाबेन या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची बातमी काही ठिकाणी व्हायरल झालेली तुम्ही पाहिली असेल. प्रत्येक पक्ष विविध पद्धतीने आपापली रणनीति आखतो. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसने ही नवी खेळी खेळल्याचे काहींना वाटले असेल. व्हायरल पोस्टमध्ये युजरने लिहिले आहे की- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन मोदी या काँग्रेसमध्ये सामील झाल्या.

संशोधन केल्यावर समजले की...

व्हायरल पोस्टबाबत अधिक तपासाला सुरुवात करताना, आम्ही सर्वप्रथम वेगवेगळ्या कीवर्डसह या व्हायरल बातमीचा शोध सुरू केला. परंतु आज तकच्या वेबसाइटवर दाव्याशी संबंधित बातम्या आम्हाला आढळल्या नाहीत. त्यानंतर आम्ही आज तक चॅनेलच्या ग्राफिक्सशी व्हायरल पोस्टमधील समाविष्ट केलेले ग्राफिक्स तपासून पाहिले. त्यात आम्हाला फरक दिसला.

उदाहरणार्थ, आजतकचे जेव्हा ब्रेकिंग न्यूजचे ग्राफिक्स चालवते तेव्हा ते मजकूराच्या शेवटी पूर्णविराम वापरत नाहीत, पण व्हायरल ग्राफिक्समध्ये मात्र पूर्णविराम वापरण्यात आला आहे.

याशिवाय आम्हाला २०१७ या वर्षातील टाइम्स ऑफ इंडिया (अर्काइव्ह) ची एक बातमी सापडली. त्या वृत्तानुसार, काँग्रेस पक्षाची अशी इच्छा होती की जशोदाबेन यांनी गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक लढवावी. पण त्यांनी यासाठी नका दिला. तसेच जशोदाबेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचेही समर्थन केले होते.

या व्हायरल पोस्टबाबत २०२३ मध्येही फॅक्ट क्रेसेंडो यांनी फॅक्ट चेक केले होते. त्यामध्ये हा दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु निवडणुकीबाबत सद्यस्थिती पडताळून पाहण्यासाठी आम्ही जशोदाबेन यांचे बंधू अशोक मोदी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितले की जशोदाबेन काँग्रेसमध्ये सामील झालेल्या नाहीत. व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा विचार नाही. ही बातमी दरवर्षी अशाच प्रकारच्या दाव्यासह शेअर केली जाते. जशोदाबेन जर एखाद्या राजकीय पक्षात सामील होणार असतील तर त्याबद्दलची माहिती दिली जाईल.

निष्कर्ष-

पोस्टच्या पडताळणीनंतर आम्ही अशा निष्कर्षावर पोहोचलो की व्हायरल पोस्टमधील दावा चुकीचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन या काँग्रेसमध्ये सामील झाल्याचा दावा खोटा आहे.

(सदर फॅक्ट चेक 'फॅक्ट क्रेसेंडो' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: Pm Modi wife Jashodaben joining congress claim is false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.